सांगलीत बेदाणा सौदे पुन्हा सुरू, हिरव्या मनुक्यांना सर्वाधिक मागणी, किती मिळाला दर?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Raisins Rate: दिवाळीनंतर सांगलीतील बेदाणा मार्केटच्या सौद्यांना पुन्हा प्रारंभ झाला. यंदा हिरव्या बेदाण्यांना सर्वाधिक मागणी असून प्रतिकिलोच्या दरांत 25 रुपयांनी वाढ झालीये.
सांगली: दिवाळीनंतर बंद झालेल्या बेदाणा सौद्यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक वाढली असून दरातही वाढ झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीनंतर बेदाणा सौदे सुरू झाल्यावर मार्केटमध्ये 190 टन बेदाण्याची आवक झाली. पहिल्याच सौद्यात बेदाण्याला 20 ते 25 रुपयांनी चढा भाव मिळाला. बाजारात हिरव्या गोल आणि लांब बेदाण्याला सर्वाधिक मागणी असून 160 रुपये ते 195 रुपयांपर्यंतचा भाव मिळाला.
शून्य पेमेंटसाठी व दिवाळी सुट्टीमध्ये सांगली, तासगाव बेदाणा असोसिएशनने सांगली व तासगावातील बेदाणे सौदे बंद ठेवले होते. दिवाळीनंतर बुधवारी व शुक्रवारी सांगली मार्केट यार्डात बेदाणा सौद्यांमध्ये चांगलीच आवक झाली. बेदाण्याची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदीदार आले होते. त्यावेळी चांगल्या हिरव्या गोल व लांब बेदाण्यास 160 ते 195 रुपये प्रतिकिलो तर मध्यम दर्जाच्या बेदाण्यास 120 ते 150 रुपये दर मिळाला. तर काळा बेदाण्यांना 60 ते 100 रुपये दर मिळाला आहे. पिवळा बेदाण्यास 120 ते 180 रुपये दर मिळाला. दिवाळीपूर्वी बेदाण्यास मिळणाऱ्या दरात सध्या 15 ते 20 रुपये दर वाढला आहे.
advertisement
सध्या पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात आहेत. आगाप छाटणी असल्यामुळे अनेक बागा फ्लॉरिंग व पोग्या स्टेजमध्ये आहेत. अनेक बागा खराब झाल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या होळी सणासाठी फेब्रुवारीमध्ये बेदाण्याची आवक कमी होण्याची शक्यता असल्यामुळे व्यापारी सध्या बेदाणी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. बुधवारी 19 दुकानात 32 गाडी तर शुक्रवारी 15 दुकानात 18 गाडी बेदाणाची आवक झाली आहे.
advertisement
दरम्यान 'शून्य पेमेंटची चांगली संकल्पना' असून सांगली बाजार समितीचा एक विश्वासू बाजारपेठ म्हणून देशात लौकिक आहे. जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट हा उपक्रम यशस्वी पूर्ण केला आहे. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगली बाजार समिती विक्रीसाठी आणावा, असे आवाहन सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
December 01, 2024 4:40 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सांगलीत बेदाणा सौदे पुन्हा सुरू, हिरव्या मनुक्यांना सर्वाधिक मागणी, किती मिळाला दर?