शनिवारी (१ नोव्हेंबर) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे प्रत्येकी १२० मिमी पावसाची नोंद झाली. सिंधुदुर्गमधील दोडामार्ग आणि सावंतवाडी येथे ८० मिमी पाऊस झाला.
राज्याच्या कमाल तापमानात घट दिसून येत असून, तापमानाचा पारा काही भागात ३० अंशांच्या खाली गेला आहे. अमरावतीत ३३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले, तर धुळ्यातील किमान तापमान १४.७ अंश सेल्सिअस इतके होते.
advertisement
कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
आज (२ नोव्हेंबर) रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील उर्वरित भागात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राचे संकेत
‘मोंथा ’ चक्रीवादळाचे अवशेष असलेले ठळक कमी दाब क्षेत्र सध्या पश्चिम बंगाल आणि त्याच्या आसपासच्या भागात सक्रिय आहे. अरबी समुद्रातील कमी दाब प्रणालीची तीव्रता कमी होत असली, तरी गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत आणखी एक ठळक कमी दाब क्षेत्र तयार होत आहे. त्याचबरोबर, थायलंडच्या आखातात दक्षिण म्यानमारच्या किनाऱ्यावर चक्राकार वारे वाहत असून, या भागात आज (ता. २) नव्या कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.
पावसाचा जोर कमी होत असल्याने आता रब्बी हंगामाच्या पिकांची तयारी करण्याची योग्य वेळ आली आहे. हवामानातील ओलावा आणि तापमानातील घट यामुळे पेरणीसाठी अनुकूल वातावरण तयार होईल.
शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला काय?
माती परीक्षण करून आवश्यक पोषक घटकांची पातळी तपासावी. त्यानुसार खत व्यवस्थापन ठरवावे. जमिनीची नांगरणी खोलवर करून ओलावा टिकवून ठेवावा. गहू, हरभरा, ज्वारी, आणि कांदा या रब्बी पिकांसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी. तसेच पावसाची शक्यता असताना बियाणे पेरणी काही दिवस पुढे ढकलणे फायदेशीर ठरेल.
