पुणे : आजकाल अनेक जण आपलं क्षेत्र सोडून वेगवेगळे प्रयोग करताना पाहिला मिळतात. याच उत्तम उदाहरणं म्हणजे अभिजीत ताम्हाणे आणि त्यांच्या मैत्रीण पल्लवी पेठकर यांनी पुण्यातील सिंहगड रस्ता धायरी फाटा येथे अर्बन फार्मिंगचा यशस्वी प्रयोग केला आहे. स्वतःची जागा नसतानाही शेती स्वतः पिकवा अन् ताजा भाजीपाला खा असा प्रयोग केला असून दीड एकरामध्ये हे सगळं क्षेत्र आहे. गेली चार वर्ष झालं ते हा प्रयोग करतात. ही शेती संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.
advertisement
मृद्गंधा हा प्रोजेक्ट 2020 मध्ये अभिजीत ताम्हाणे आणि त्यांच्या मैत्रीण पल्लवी पेठकर यांनी सुरू केला. शेती आणि बागकामाच्या आवडीला व्यवसायाची जोड देण्याच्या विचारातून हा प्रयोग सुरू केला. यामध्ये भाजीपाला, फुलशेतीची आवड असणाऱ्या कुटुंबांसाठी दीड एकरामध्ये 750 चौरस फुटाचे प्लॉट तयार केले. यामध्ये सऱ्या आणि गादीवाफे केले असून या प्रकल्पामधील प्लॉटस एका वर्षासाठी भाज्यांची शेती करण्यासाठी दिले जातात. त्यासाठी प्रति महिना रुपये 4124 फी आकारली जाते.
ऊस शेतीला दिला फाटा, केली केळीची लागवड, शेतकऱ्याची 11 महिन्यात 11 लाखांची कमाई
सहयोगी शेतकऱ्यांनी शनिवार, रविवार किंवा त्यांच्या सवडीनुसार, मृद्गंधामध्ये येऊन प्लॉटमधील सऱ्या, गादीवाफ्यांची मशागत करावी, त्यामध्ये शेणखत, गांडूळखत मिसळावे, स्वतःच्या हाताने भाजीपाला बियाणे, रोपांची लागवड करावी, मातीची भर द्यावी, झारीने पाणी घालावे अशा प्रकारे विविध कामाचे नियोजन केलेले असते. काढणीस आलेला भाजीपाला घरी न्यावा, स्वतःच्या शेतीचा आनंद घ्यावा, अशी ही संकल्पना आहे.
सध्या 70 प्लॉट तयार केले आहेत, त्यातील 60 प्लॉटवर भाजीपाला लागवड देखील झाली आहे. आम्ही येथे 30 प्रकारच्या भाजीपाल्याची हंगामानुसार निवड केली आहे. यामध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, कांदा, विविध पालेभाज्या, मुळा, गाजर, बीट, काकडी, दोडका, कारली, दुधी, मधू मका, मोहरी, मिरची, रंगीत कोबी, फ्लॉवर तसेच झुकिनी, ब्रोकोली, बेसील अशी विदेशी भाजीपाला लागवड आहे. कुटुंबातील सदस्य आपल्या आवडीच्या भाजीपाल्याची लागवडीसाठी निवड करतात.
त्याप्रमाणे बियाणे, रोपे आम्ही त्यांना देतो. येथील सर्व भाजीपाला पिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन ठेवले आहे. जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी केली जाते. हे देखील मुळशी, भोर परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केले जाते. झेंडू, चवळी, मका यासारख्या सापळा पिकांची भाजीपाला पिकांमध्ये लागवड केली आहे. या प्रक्षेत्रावर विविध प्रकारचे पक्षी येतात, ते देखील कीड नियंत्रण करतात.
शहरी लोकांना शेतकऱ्यांचे कष्ट कळावेत, पीक लागवडीपासून ते काढणीपर्यंत काय अडचणी असतात, त्यावर मात करून शेतकरी दर्जेदार उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचवितो, याची जाणीव आणि अन्नधान्याचे महत्त्व कळावे, हा पण उद्देश आहे, अशी माहिती पल्लवी पेठकर यांनी दिली आहे.