सांगली : डाळिंब पिकासाठी कोरडी हवा व कडक हिवाळा चांगला मानवतो. फळांची वाढ होताना आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्यास रोग व किडीचे प्रमाण वाढते व फळांचा दर्जा खालावू शकतो. परंतु, फळांच्या पूर्ण वाढीनंतर आर्द्रता वाढल्यास फळास वरून व आतून चांगला रंग येतो. बदलत्या वातावरणात व वाढत्या थंडीत डाळिंबाचा रंग आतून आणि बाहेरून चांगला ठेवण्यासाठी शेतकरी वेगवेगळे उपया करत असतात. सांगलीतील डाळिंब उत्पादक शेतकरी राजाराम भिंगे यांनी लोकल18 सोबत बोलताना याबाबत माहिती दिलीये.
advertisement
“हिवाळ्यात थंडी आणि धुक्यामुळे डाळिंब शेतीचे नुकसान होते. या काळात डाळिंबाच्या बागेचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असते. आम्ही डाळिंबाच्या बागेसाठी मार्केटमध्ये उपलब्ध असणारे नेट किंवा पातळ कापड आणून बागेला अच्छादन करून घेतो. त्यामुळे फळाचे कीड व रोगांपासून संरक्षण होते. तसेच त्याला रंगही चांगला येतो,” असे शेतकरी भिंगे यांनी सांगितले.
22 दिवसांमध्ये पिक हातात, खर्च फक्त 10 हजार; 3 लाख कमाईची हमी!
अशी घेतली डाळिंब शेतीची काळजी
थंडीच्या दिवसांत डाळिंबाच्या बागेवर वेळच्या वेळी फवारणी केली जाते. खराब डाळिंब बाजूला काढून टाकली जातात. फळे अगदी कमी असतील तर इथून पुढे कळ्या निघाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. मार्गदर्शकाच्या सल्ल्याने योग्य त्या फवारण्या करणं फायद्याचं ठरतं. तसेच धुक्यानं आणि वातावरणातील बदलाने डाळिंबावर डाग किंवा चट्टे पडू नयेत म्हणून झाडांवर नेट बांधून घ्यावे, असं देखील शेतकरी भिंगे सांगतात.
नेटचे आच्छादन करण्याचे फायदे
बाजारपेठेमध्ये ग्राहक गडद गुलाबी तसेच लाल रंगाच्या डाळिंबांना अधिक पसंती देतात. डाळिंबाच्या झाडांना नेटने अच्छादन दिल्यास ग्राहकांना हवा तसा गडद रंग डाळिंबांमध्ये उतरतो. नेटने अच्छादने हे डाळिंबाच्या आधुनिक तंत्रापैकी एक आहे. या तंत्राच्या अचूक वापराने निर्यातक्षम डाळिंब उत्पादित करता येतात. नेट अच्छादन हे खर्चिक तंत्र असले तरी याच्या वापराने डाळिंब उत्पादनाचा दर्जा सुधारतो आहे. यासह नेटच्या अच्छादनामुळे वातावरणातील बदल, धुके आणि थंडीच्या परिणामांपासून डाळिंब पिकाचे संरक्षण होत असल्याचं देखील डाळिंब बागायतदार सांगतात.