सोलापूर – सध्याच्या काळात अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगळे प्रयोग करत आहेत. सोलापूरच्या एका शेतकऱ्यानं तुरीची शेती केली असून एका झाडाला तब्बल 1400 शेंगा लागल्या आहेत. दक्षिण सोलापुरातील निंबर्गीचे शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी सुधारित तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही किमया केलीये. विशेष म्हणजे या तुरीच्या शेतीतून 6 महिन्यात उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्याचं बिराजदार यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
निंबर्गीचे गंगाधर बिराजदार हे प्रयोगशील शेतकरी आहेत. परभणी विद्यापीठाने विकसित केलेल्या गोदावरी जातीच्या तुरीच्या वाणाची लागवड त्यांनी आपल्या 8 एकर शेतात केली आहे. 20 जून 2024 रोजी त्यांनी या तुरीच्या वाणाची लागवड केली होती. आता 6 महिन्यांच्या काळात ही तूर काढणीला आली असून एका झाडाला तब्बल 1200 ते 1400 शेंगा आहेत. त्यामुळे तूर शेतीतून 14 ते 15 क्विंटल उत्पन्न मिळेल, असा अंदाज असल्याचं बिराजदार सांगतात.
सोलापूरचा नादखुळा, कृषी प्रदर्शनात होतेय 'खासदार', 'आमदार' आणि 'सरपंचा'ची विक्री
कशी केली लागवड?
गोदावरी जातीची तूर भरघोस उत्पन्नासाठी ओळखली जाते. हा वाण मर रोगास प्रतिबंधक आहे. त्यामुळे 8 एकर क्षेत्रात 7 बाय 3 फूट अंतरावर लागवड केली. ट्रॅक्टरच्या सहाय्याने 3 फवारणी केल्या. आता हे झाड तुरीच्या शेंगांनी लगडले आहे. एका झाडावर सरासरी 1200 ते 1400 शेंगा आहेत. त्यामुळे एकरी 14 ते 15 क्विंटल उत्पन्न मिळण्याची आशा आहे. सध्याच्या दराप्रमाणे विचार केल्यास 6 महिन्यात 8 ते 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल, असं बिराजदार सांगतात.
तूर उत्पादनासाठी मिळाला होता पुरस्कार
बिराजदार यांनी यापूर्वीही विक्रमी तूर उत्पादन घेतले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. लालासाहेब तांबडे, अमोल शास्त्री, ऑजारी, कृषी सहायक अशोक राठोड यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. गंगाधर बिराजदार यांनी यापूर्वी तुरीचे विक्रमी उत्पादन घेऊन राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे बिराजदार हे आपल्या शेतात द्राक्षासह विविध पिके देखील घेतात.





