TRENDING:

सुपर वुमन! पतीच्या निधनानंतर खचून न जाता केली शेती, 36 गुंठ्यात घेतलं उसाचे 105 टन उच्चांकी उत्पादन

Last Updated:

पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता शेतीची आवड जोपासून आपल्या कुटुंबाची जबाबदारी आत्मविश्वासाने पेलत ऊस शेतीमध्ये उच्चांक गाठत आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सांगलीच्या महिला शेतकरी विजया नंदकुमार जाधव यांची कहाणी प्रेरणादायी आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रीती निकम, प्रतिनिधी
advertisement

सांगली : आज प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्व यशस्वीपणे सिद्ध करत आहेत. त्यात शेती क्षेत्र देखील मागे राहिले नाही. पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता शेतीची आवड जोपासून आपल्या कुटुंबाची जबाबदारी आत्मविश्वासाने पेलत ऊस शेतीमध्ये उच्चांक गाठत आपले अस्तित्व सिद्ध करणाऱ्या सांगलीच्या महिला शेतकरी विजया नंदकुमार जाधव यांची कहाणी प्रेरणादायी आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील आसद येथील शेतकरी महिला विजया नंदकुमार जाधव यांनी ऊस शेतीतून 36 गुंठ्यात 105 टनाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे.

advertisement

विजया जाधव यांना पहिल्यापासूनच शेतीची आवड आहे. विवाहानंतर पती-पत्नी शेतामध्ये ऊसासह भाजीपाल्याची शेती करत होते. पतीच्या निधनानंतर दोन-तीन वर्ष त्यांनी भाजीपाला पिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजीपाला शेतीच्या व्यापाच्या तुलनेत कमी नफा असल्याने त्यापुढे ऊस शेतीकडे वळल्या.

22 दिवसांमध्ये पिक हातात, खर्च फक्त 10 हजार; 3 लाख कमाईची हमी!

21 वर्षांपूर्वी नंदकुमार जाधव यांचे अकाली निधन झाले. पतीच्या अचानक जाण्याने विजया खचून गेल्या नाहीत. त्यांनी जिद्दीने दोन मुली आणि एक मुलगा असलेल्या आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलली. मुळातच असलेली शेतीची आवड त्यात पतीच्या जाण्याने कुटुंबाची जबाबदारी असल्याने विजया यांनी अधिकच अभ्यासपूर्ण शेती केली. आपल्या सव्वादोन एकर शेतीला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची जोड देत शेतकरी विजया यांनी शेतीतील जवळपास सर्वच कामे आणि त्यासंबंधी व्यवहार लिलया सांभाळले आहेत.

advertisement

आता मुलगा आणि मुलींचे संसार व्यवस्थित चालले आहेत. विजया यांचा मुलगा नितीन व्यवसायानिमित्त परराज्यामध्ये असल्याने आजही वयाच्या 63 व्या वर्षी त्या शेतीची सर्व कामे सांभाळत आहेत. शेतीची आवड आणि कष्टाला फळ मिळत असल्याने कामाचा कंटाळा वाटत नाही. त्यामुळे वाट्याने कोणालाही शेती पिकवायला न देता स्वतःच शेती सांभाळण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

advertisement

असे करतात उसाचे व्यवस्थापन 

शेतकरी विजया जाधव यांनी आडसाली ऊस लागवडीचे तंत्र आत्मसात केले आहे. त्या नेहमी अडसाल ऊस लागवड करतात. उन्हाळ्यामध्ये शेत तापवून एकरी नऊ ट्राॅली शेणखत घालतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात ऊस लागवड करतात. 86032 ऊस वाण त्या नेहमी लावतात. लागवड पूर्व मशागतीपासून शेतामध्ये बारीक लक्ष देतात. पूर्वी शेतीच्या औषध फवारणी पासून सर्व कामे त्या स्वतःच पाहत होत्या.

advertisement

अलीकडे त्या मजुरांच्या मदतीने शेतीची सर्व कामे वेळच्यावेळी करून घेतात. गावातील कृषी सेवा केंद्र चालकांच्या सल्ल्याने आणि प्रगतशील शेतकरी असलेल्या त्यांच्या जावयांच्या सल्ल्याने उसाचे व्यवस्थापन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

मशागत, खते, लागवड, पाणी यांचे योग्य नियोजन करत एकरी 100 हून अधिक टन उसाच्या उत्पादनात सातत्य ठेवले आहे.

आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानित 

विजया जाधव यांच्या उच्चांकी ऊस उत्पादनाची दखल घेत परिसरातील दोन सहकारी साखर कारखान्यांकडून त्यांना उच्चांकी ऊस उत्पादनाबद्दल आदर्श शेतकरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 2024-25 च्या चालू गळीत हंगामामध्ये त्यांनी अवघ्या 36 गुंठामध्ये 105 टनाचे उच्चांकी उत्पादन घेतले आहे. नशिबी पतीची साथ नसताना देखील जिद्दीने शेती पिकवत उच्चांकी ऊस उत्पादन घेणाऱ्या विजया यांची शेतीत कष्ट करण्याची आवड शेतकरी तसेच महिलांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

मराठी बातम्या/कृषी/
सुपर वुमन! पतीच्या निधनानंतर खचून न जाता केली शेती, 36 गुंठ्यात घेतलं उसाचे 105 टन उच्चांकी उत्पादन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल