गोमूत्रामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह आणि इतर पोषक द्रव्यं असतात. हे घटक पिकांच्या नैसर्गिक वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. मका आणि भाजीपाला पिकांवर गोमूत्राचा योग्य प्रमाणात आणि पद्धतीने वापर केल्यास पिकांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि उत्पादनही चांगलं मिळतं, असं युवराज जंगले सांगतात.
advertisement
गोमूत्राचा वापर खत आणि कीटकनाशक म्हणूनही केला जातो. गोमूत्रात स्थानिक औषधी वनस्पती मिसळून तयार केलेल्या द्रावणाची फवारणी केल्यास कीटक आणि रोगांपासून पिकांचे संरक्षण होते. शिवाय हे द्रावण पर्यावरणास हानिकारक नसते म्हणून त्याचा उपयोग करताना कोणताही दुष्परिणाम होत नाही. रासायनिक फवारणीमुळे जसा मातीचा पोत बिघडतो तसं गोमूत्राच्या वापरामुळे होत नाही.
गोमूत्राचा वापर केवळ खत म्हणूनच नव्हे तर जैविक शेतीसाठी संपूर्ण उपाय म्हणून होऊ शकतो. काही शेतकरी गोमूत्रात शेण आणि जैविक कचरा मिसळून जैविक खत तयार करतात. अशा खताचा वापर केल्यास जमिनीची जीवसृष्टी वाढते आणि जमिनीचा पोत सुधारतो. ज्यांना रासायनिक शेतीतून नैसर्गिक शेतीकडे वळायचं आहे, त्यांच्यासाठी गोमूत्र हा एक सहज स्वस्त आणि प्रभावी मार्ग आहे, असं युवराज जंगले सांगतात
एकूणच गोमूत्राचा शेतीत वापर हा शाश्वत, पर्यावरणपूरक आणि फायदेशीर पद्धतीकडे नेणारा मार्ग आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं स्वप्न असतं आणि गोमूत्र त्यासाठी एक प्रभावी पर्याय ठरतोय.





