वाल्मीक कराड तुरुंगात बंद असताना आता बीडमध्ये आणखी एक गँग ॲक्टीव्ह झाली आहे. बीडमध्ये गेल्या काही काळात वाल्मीक कराड गँगसह वाळू माफिया, राख माफिया यांची दहशत पाहायला मिळाली होती. याबाबतच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. या घटना ताज्या असताना आता बीडमध्ये पाणी माफीयाची दहशत देखील समोर आली आहे. पाणी माफीयाकडून पालिका कर्मचाऱ्यांना चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून धमकावलं जात असल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, बीडला माजलगाव प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. या ठिकाणाहून जी जलवाहिनी बीडपर्यंत येते, त्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. यामुळे बीडच्या अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बीड शहरातील ईदगाह परिसरात असलेल्या जलकुंभावर पाणी उपलब्ध आहे. परंतु या ठिकाणी खासगी टँकर चालक आणि काही स्थानिक लोकांची दहशत निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मलाच आधी पाणी पाहिजे, असे म्हणत इथे ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाकू, तलवारीचा धाक दाखला जात आहे. यामुळे आता मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोलीस संरक्षण मागितले आहे. दुसरीकडे, या ठिकाणी काम करणारे कर्मचारी प्रचंड दहशतीत असून आम्हाला पोलीस संरक्षण द्या, तरंच आम्ही ड्युटी करू, अशी भूमिका घेतली आहे. वाल्मीक कराड, वाळू माफिया, राख माफियानंतर बीडमध्ये पाणी माफियाची नवी गँग अॅक्टीव्ह झाल्याने बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे.
