ही घटना पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील बसवेश्वर नगरात घडली. इथं कदम कुटुंब वास्तव्याला आहे. बुधवारी रात्री जेवण झाल्यानंतर हे कुटुंब झोपी गेलं होतं. सर्वजण गाढ झोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास घरात अचानक पेट्रोलने पेट घेतलेले गोळे पडायला सुरुवात झाली. साखर झोपेत असलेल्या कुटुंबाला नक्की काय घडतंय, याचा काहीच थांगपत्ता नव्हता.
जेव्हा कुटुंबीयांचे डोळे उघडले तेव्हा त्यांच्या वाचण्याचे जवळपास सगळे मार्ग बंद झाले होते, घराने पेट घेतला होता. अनेक संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र यामध्ये नागनाथ कदम, योगेश कदम आणि सुबोध कदम हे तिघेजण गंभीर भाजले. ही आग नेमकी कुणी आणि का लावली? याची माहिती अद्याप समोर आली नाही.
advertisement
तिन्ही जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तिघांची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आग लावणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच आग लावण्यामागचं कारणंही शोधलं जात आहे. पण झोपेत असलेल्या कुटुंबाला अशाप्रकारे जाळण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.