महादेव गायकवाड असं मृत पावलेल्या ४८ वर्षीय ढाबा मालकाचं नाव आहे. ते माजलगाव तालुक्यातील मनूर येथील रहिवासी होते. मयत गायकवाड यांचं राष्ट्रीय महामार्गावरील माजलगाव-नागडगाव फाट्यावर 'गावरान ढाबा' नावाचं हॉटेल आहे. घटनेच्या दिवशी २० तारखेला सायंकाळी गायकवाड यांच्या ढाब्यावर काही लोक मद्य प्राशन करण्यासाठी आले होते. मद्य प्राशन केल्यानंतर ढाब्यात पाच मद्यपींमध्ये वाद झाला.
advertisement
हा वाद सोडवण्यासाठी ढाबा मालक महादेव गायकवाड, त्यांचा मुलगा आणि एक स्वयंपाकी मध्यस्थी करायला गेले. यावेळी मद्यपींनी तिघांवर लाकडी दांड्यांनी हल्ला केला. यात महादेव गायकवाड यांच्या डोक्यात वर्मी घाव लागल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत महादेव गायकवाड यांचा मुलगा आणि स्वयंपाकी दोघं जखमी झाले. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे मराठवाडा विभागीय सचिव कृष्णा लांब यांनी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंखे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही सोशल मीडियावर दोन पोस्ट करत आमदार सोळंखे यांनी आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप केला आहे. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी २ हजार रुपयांच्या बिलासाठी आरोपींनी ढाबा मालकाचा खून केल्याचा आरोप केला आहे. तसेच प्रकाश सोळंखे यांच्या आशीर्वादानेच खूनी थोरवे आणि त्यांची टोळी फरार झाल्याचा आरोप केला आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये आरोपीच्या आमदारासोबत ३० वर्षांपासून संबंध आहेत. त्यांची कुंडली बाहेर येऊ नये म्हणून रात्रीच आरोपींचे सोशल मीडिया अकाऊंट डिलीट केल्याचा दावा देखील कृष्णा लांब यांनी केला.
