तेजस गजानन महाजन (वय 13) असे मयत बालकाचे नाव आहे. तो रिंगणगाव येथे आई,वडील, मोठी बहीण यांच्यासह राहत होता. तेजसचे वडील गजानन हे शेती काम करून हार्डवेअरचे दुकान चालवत उदरनिर्वाह करीत आहेत. दरम्यान सोमवार रोजी गजानन महाजन यांनी त्यांचा 13 वर्षीय मुलगा तेजस महाजन याला दुकानावर बसवून जळगावला कामानिमित्त निघून गेले होते. तर तेजस हा दुकान बंद करून घरी जाणे कुटुंबीयांना अपेक्षित होते. मात्र तेजस घरी आला नाही. सोमवारी गावाच्या बाजाराचा दिवस देखील होता. तेजस घरी न आल्याने शोधाशोध सुरू झाली. त्यानंतर धास्तावलेल्या कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.
advertisement
यानंतर आज सकाळीच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील खर्ची गावाजवळ निंबाळकर यांच्या शेतामध्ये 13 वर्षीय मुलाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत असल्याची माहिती एरंडोल पोलिसांना काही ग्रामस्थांनी दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. हा मृतदेह तेजस याचा असल्याची खात्री पटवली. या घटनेमुळे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.
घटनास्थळी मोबाईल फॉरेनसिक व्हॅन दाखल झाली असून तपास सुरू झाला आहे. दरम्यान बालकाची हत्या करण्यामागील कारण काय याबाबतचा तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर काही इसमांची संशयित म्हणून धरपकड केली असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, ह्त्येच्या या घटनेने तालुक्यासह जिल्हादेखील हादरला आहे.
