जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील एका गावात टवाळखोरांनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढत तिला मारहाण केली. टवाळखोरांच्या या छेडछाडीला कंटाळून 15 वर्षीय अल्पवयीन मुलीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या पीडित मुलीला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात दाखल करण्यात आले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीवर उपचार सुरू आहेत.
advertisement
अल्पवयीन पीडित मुलगी ही शाळेत जात असतानाही टवाळखोर तिच्या मागावर असायचे. मुलगी शाळेत जाताना टवाळखोरांकडून शेतात जाताना पाठलाग केला जायचा. वारंवार अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आरोप पीडित मुलीने केला. अल्पवयीन मुलीने टवाळखोरांना विरोध केल्याने टवाळखोरांनी थेट मुलीच्या घरात घुसून पीडित मुलीची आणि तिच्या बहिणीची छेड काढली. त्याशिवाय बहिणीलादेखील मारहाण केल्याचा पीडित मुलीसह तिच्या वडिलांनी आरोप केला आहे.
या प्रकरणी अद्यापही पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नाही. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पीडित मुलीशी भेट घेऊन प्रकृतीची चौकशी केली. पीडित मुलीच्या बहिणीने व पालकांनी पालकमंत्र्यांसमोर घडलेला सगळा प्रसंग सांगितला. यावेळी त्यांनी या टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
