या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ रेल्वे स्थानकावर दोन जण संशयास्पद पद्धतीने फिरत होते. यावेळी पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी आरोपींच्या बॅगेची तपासणी केली. तेव्हा त्यांच्या बॅगेत जवळपास एक कोटी रुपयांच्या नकली नोटा आढळून आल्या. दोघही जण मलकापूर येथून भुसावळला आले होते. पण रेल्वे स्थानकावर उतरताच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.
advertisement
पोलिसांना संशय येताच एक संशयित फरार झाला. तर दुसऱ्या संशयताला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आलं. पाचशे रुपयांच्या नोटांच्या बंडलमध्ये वरील एक नोट खरी तर बाकी बंडलमध्ये चिल्ड्रन बँक लिहिलेल्या नकली नोटा होत्या. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयताकडून रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.
आरोपीनं या नोटा नेमक्या कशासाठी आणल्या होत्या. याचा वापर कशासाठी होणार होता? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र रेल्वेतून अशापद्धतीने नकली नोटांची तस्करी होत असल्याने रेल्वे पोलीस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. यापूर्वी आरोपींनी अशाप्रकारे नकली नोटांची तस्करी केली होती का? या नोटा कशासाठी वापरल्या? याचा तपास पोलीस करत आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे.
