बीडच्या परळी तालुक्यात दोन पुतण्यांनी आपल्या काकूची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केला आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शिरसाळा पोलीस ठाण्यात दोन पुतण्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे असं गुन्हा दाखल झालेल्या पुतण्यांची नावं आहेत.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांना दारुचं व्यसन आहे. घटनेच्या दिवशी आरोपीने काकूंकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले होते. पण काकूंनी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे आरोपीनं काकूंसोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी पुतण्याने काकूच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिचा खून केला.
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणातून पुतण्याने अशाप्रकारे काकूची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिमळाबाई कावळे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे. या प्रकरणात शिरसाळा पोलिसांनी पुतण्या चंद्रकांत कावळे आणि धुराजी कावळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
