उदयपूरमधील 'इंदिरा आयव्हीएफ'चे मालक डॉ. अजय मुर्डिया यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. डॉ. अजय मुर्डिया यांनी उदयपूर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये धक्कादायक आरोप केले आहेत.
डॉ. मुर्डिया यांचे विक्रम भट्ट यांच्यावर गंभीर आरोप
डॉ. मुर्डिया यांनी तक्रारीत म्हटले आहे की, विक्रम भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना चार चित्रपटांमध्ये, ज्यात त्यांच्या दिवंगत पत्नीच्या बायोपिकचाही समावेश होता, ३० कोटींहून अधिक रक्कम गुंतवण्यासाठी राजी केले. या आरोपींनी चित्रपटांमध्ये गुंतवणूक केल्यास तब्बल २०० कोटी रुपयांपर्यंत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवले. मात्र, मोठी रक्कम घेऊनही भट्ट यांनी चित्रपट पूर्ण केले नाहीत आणि दिलेले वचन पाळले नाही, अशी डॉ. मुर्डिया यांची तक्रार आहे.
advertisement
भट्ट कुटुंबासह ८ जणांवर गुन्हा दाखल
या संपूर्ण फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट यांच्यासह एकूण आठ जणांना आरोपी करण्यात आले आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरातून विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना अटक करण्यात आली आहे. या एफआयआरमध्ये विक्रम आणि श्वेतांबरी यांच्यासह त्यांची मुलगी कृष्णा भट्ट, उदयपूरचा स्थानिक दिनेश कटारिया, सहनिर्माता महबूब अन्सारी आणि अन्य काही जणांचा समावेश आहे.
यापूर्वी या प्रकरणात सहनिर्माता महबूब अन्सारी याला अटक झाली होती. आता पोलीस या संपूर्ण प्रकरणातील करारांची कागदपत्रे, बँक स्टेटमेंट आणि झालेल्या व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.
बॉलिवूडमधील एका मोठ्या दिग्दर्शकाला आणि त्यांच्या पत्नीला अशा प्रकारे आर्थिक फसवणुकीच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे इंडस्ट्रीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या तपासातून आणखी कोणते खुलासे होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
