हास्यजत्रेतील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारा अभिनेता निमिष कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
डोक्यावर मुंडावळ्या, गुलाबी धोतर
निमिष कुलकर्णीच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये निमिषच्या डोक्यावर मुंडावळ्या बांधलेल्या दिसत आहेत. त्याने गुलाबी रंगाचे धोतर आणि शेला परिधान केला आहे. नवऱ्या मुलाच्या रूपात निमिष खूपच राजबिंडा आणि उत्साही दिसत आहे.
advertisement
निमिषच्या एका मित्राने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत, येत्या चार दिवसांत त्यांचे लग्न होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
कोमल भास्करशी बांधणार गाठ
निमिष कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वीच गुपचूप साखरपुडा उरकून चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. निमिषने २५ जुलै २०२५ रोजी अभिनेत्री कोमल भास्कर हिच्याशी साखरपुडा करत आपल्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली होती. या साखरपुड्याचे फोटो अचानक समोर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता साखरपुड्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच निमिष आणि कोमल लग्नबंधनात अडकणार आहेत.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या निमिष कुलकर्णीला त्याच्या नव्या आयुष्याच्या प्रवासासाठी चाहत्यांकडून भरभरून शुभेच्छा मिळत आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील ही 'लगीनघाई' अजून काही दिवस अशीच सुरू राहणार आहे.
