प्राजक्ता-शंभुराजचा राजेशाही थाट
पुण्यात पार पडलेला प्राजक्ता आणि शंभुराज खुटवड यांचा विवाहसोहळा अगदी राजेशाही थाटाचा होता. या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. प्राजक्ताने लग्नासाठी खास हिरव्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती. त्यावर भरजरी सोन्याचे दागिने, नथ आणि मुंडावळ्या अशा पारंपरिक वेशात ती खूपच सुंदर दिसत होती. तर वर शंभुराज यांनी पांढऱ्या रंगाचा अंगरखा आणि डोक्यावर आकर्षक फेटा बांधला होता. दोघांचा पारंपरिक लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
advertisement
लग्न ही प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील एक मोठा प्रसंग आहे. यावेळी आपल्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करण्याची हुरहूर असते, तर आपल्या आईवडिलांचं घर सोडण्याचं दुःखही मुलींच्या मनात असते. असंच काहीसं प्राजक्तासोबतही घडलं. राजश्री मराठीने प्राजक्ताच्या कन्यादानाचा व्हिडीओ त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. कन्यादानाच्या विधीच्या वेळी प्राजक्ता भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. आपल्या भावनांना आवर घालणं तिला कठीण जात होतं. तिला या अवस्थेत पाहून तिच्या आईलाही अश्रू अनावर झाले होते.
लग्नसमारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या विवाहसोहळ्यातील अनेक गमतीदार आणि भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. लग्नानंतर नवऱ्याचा कान पिळतानाचा प्राजक्ताचा गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच, शंभुराज प्राजक्ताला मंगळसूत्र परिधान करतानाचा भावनिक व्हिडिओही चाहत्यांकडून शेअर केला जात आहे.
टीव्हीवरची लाडकी सूनबाई
प्राजक्ता गायकवाड ही टीव्हीवरची एक लाडकी अभिनेत्री आहे. 'येसूबाई'च्या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. तिने 'आई माझी काळूबाई' आणि 'स्वराज्यरक्षक संभाजी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. नुकताच तिचा 'स्मार्ट सूनबाई' हा चित्रपटही रिलीज झाला आहे. तर तिचे पती शंभुराज खुटवड हे व्यावसायिक आहेत.
टीव्हीवरची लाडकी 'येसूबाई' आता खऱ्या आयुष्यात खुटवड कुटुंबाची सून झाल्याने, इंडस्ट्रीतून आणि चाहत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
