सध्या संजय कपूर यांच्या वारसाहक्कावरून दिल्ली उच्च न्यायालयात वाद सुरू आहे. ३०,००० कोटी रुपयांच्या सोना ग्रुपचे प्रमुख संजय यांचा मृत्यू १२ जून २०२५ रोजी झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगितले जात असले तरी, त्यांची आई राणी कपूर यांनी ही हत्या असल्याचा गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला अत्यंत नाट्यमय वळण मिळाले आहे. राणी कपूर यांनी संजय यांची तिसरी पत्नी प्रिया कपूर यांच्यावर थेट कोर्टात मालमत्ता लपवल्याचा आणि मृत्यूनंतर लगेचच आर्थिक गडबड केल्याचा आरोप केला आहे.
advertisement
संजय कपूरचा मृत्यू नाही तर हत्या?
संजय यांच्या निधनानंतर प्रिया कपूर यांनी सोना ग्रुपच्या कंपन्यांवर नियंत्रण मिळवण्याची जी घाई केली, त्यावर राणी कपूर यांच्या वकिलांनी प्रश्नचिन्ह उभे केले. वकील वैभव गागर यांनी कोर्टात सांगितले की, संजय यांनी मृत्यूपूर्वी, ३१ मार्च २०२३ रोजी, प्रिया कपूर यांना Aureus Investment (AIPL) च्या व्यवस्थापकीय संचालक (MD) पदावरून काढून टाकले होते, कारण त्यांना कंपनीत काही बदल करायचे होते. पण संजय यांच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ दिवसांत AIPL ची बैठक बोलावली गेली आणि प्रिया कपूर यांना पुन्हा MD बनवण्यात आले!
११ दिवसांत त्यांना सोना बीएलडब्ल्यूच्या बोर्डवरही संचालक म्हणून बसवण्यात आले. "संजय यांचा मृतदेह अजून यूकेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या हवाली केला नव्हता, तेव्हाच प्रिया कपूर यांनी कंपनीचे नियंत्रण मिळवण्याची तत्परता दाखवली, जी संशयास्पद आहे," असे गागर यांनी कोर्टात स्पष्ट केले.
संजय यांच्या आर्थिक व्यवहारांमधील मोठी तफावत आणि विल सादर केल्यानंतर लगेच घडलेल्या घटनांवर राणी कपूर यांनी चिंता व्यक्त केली. "संजय यांचा वार्षिक पगार ६० कोटी रुपये असताना, त्यांच्या बँक खात्यात फक्त २ कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम का आहे?" असा थेट प्रश्न राणी कपूर यांनी उपस्थित केला. वकिलांनी आरोप केला की, प्रिया कपूर यांनी विल सीलबंद लिफाफ्यात कोर्टात सादर केल्यानंतर थोड्याच वेळात अनेक बँक खाती रिकामी केली. हा मालमत्ता लपवण्याचा प्रकार असून, पैसे परदेशात हलवले असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
विलमधून आई आणि मुलांना वगळले
प्रिया यांनी सादर केलेल्या विलमध्ये संजय यांची आई राणी कपूर, ज्या कंपनीच्या संस्थापिका होत्या आणि त्यांची मुले सामैरा व कियान यांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे. राणी कपूर यांनी कोर्टात सांगितले की, त्यांनी आपल्या पतीसोबत ४० वर्षे संसार केला आणि त्यांच्यासाठी कंपनी उभी केली, पण संजयच्या विलमध्ये माझा साधा उल्लेखही नाही. तसेच, प्रिया कपूर यांनी उपस्थित केलेल्या दोन विवाहांमधील परंपरेवरही त्यांनी जोरदार आक्षेप घेतला.
विलवरील साक्षीदार दिनेश अग्रवाल आणि नितीन शर्मा यांची भूमिकाही संशयास्पद आहे. एका साक्षीदाराला विल ईमेल करण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, तर दुसऱ्याला मृत्यूनंतर कंपनीच्या बोर्डवर स्थान देण्यात आले. या सर्व घटनांमुळे संजय कपूर यांच्या मृत्यूपत्राची सत्यता आणि कंपन्यांमधील आर्थिक व्यवहार आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत
