अकोला जिल्ह्यात बिश्नोई गँगचे जाळे पसरत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या नावानं तब्बल १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्यानं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी एका कॉलिंग अॅपद्वारे आमदार साजिद खान पठाण यांना फोन करण्यात आला होता. हा कॉल बिश्नोई गँगच्या शुभम लोणकर यांच्या नावाने करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरून १० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असून, रक्कम न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
advertisement
फोन आला कॅलिफोर्नियातून
विशेष म्हणजे, संबंधित कॉल कॅलिफोर्नियाहून आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे, त्यामुळे या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, इन कॅमेरा काही ही बोलण्यास पठाण यांनी मनाई केली आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, कॉलचा तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.
आमदाराच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान, राजस्थान आणि इतर राज्यांमधील बिश्नोई गँगच्या हालचालींचाही तपास घेतला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झालं असून, साजिद खान पठाण यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
