लक्ष्मी मुकेश जगताप असं 20 वर्षीय मयत नववधूचं नाव आहे. तिचं १४ मेला एरंडोल तालुक्यातील भातखेडे येथील तरुण मुकेशसोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मेला लक्ष्मीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला वराच्या घरच्यांनी तातडीने एरंडोल येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
advertisement
इथं डॉक्टरांनी तपासणी केली असता लक्ष्मीला न्यूमोनिया आणि कावीळ झाल्याचं निष्पन्न झालं. यानंतर डॉक्टरांनी त्या अनुषंगाने उपचार करायला सुरुवात केली. पण अथक प्रयत्न करूनही डॉक्टर लक्ष्मीला वाचवू शकले नाहीत. घरात लक्ष्मीच्या रूपाने येणारी ही लक्ष्मी तीनच दिवसांत जग सोडून गेली. त्यामुळे लग्नघरात आनंदाच्या ठिकाणी शोककळा पसरली. शनिवारी सायंकाळी भातखेडे येथेच लक्ष्मीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी उपस्थितांना आपले अश्रू आवरता आले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून लक्ष्मीची प्रकृती बरी नव्हती. लग्नाचा मुहूर्त तोंडावर असताना तिची प्रकृती ढासळत चालली होती. अगदी लग्नाच्या दिवशी म्हणजेच १४ मे रोजी दुपारी अचानक ती चक्कर येऊन खाली कोसळली होती. त्यावेळी गावातील डॉक्टरांना बोलावून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर तिने लग्न समारंभातील विधी पूर्ण केल्या होत्या. मात्र लग्नानंतर दुसऱ्या दिवशी तिची प्रकृती आणखी बिघडली आणि यातच तिचा मृत्यू झाला. लक्ष्मी आणि मुकेशने एकत्र आयुष्याची स्वप्ने रंगवली होती. पण नियतीने त्यांच्यासोबत क्रूर खेळ केला.
