शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास गणेश काळे याची भर चौकात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. रिक्षातून चालेल्या गणेशवर गोळ्यांचे ४ राऊंड फायर करण्यात आले. तो गतप्राण झाल्यानंतरही त्याच्यावर कोयत्याने वार केले गेले. दोन दुचाकींवरून एकूण चार आले होते. गणेश काळे हा रिक्षातून प्रवास करीत होता. खडी मशीन चौकात आरोपींनी त्याच्यावर एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या गणेशला लागल्या. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार करून त्याला संपवले. काही क्षणात आरोपी घटनास्थळावरून पसार होते.
advertisement
पुणे पोलिसांची दहा पथके आरोपींच्या मागावर होती. शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंदेकर टोळीतील चार अल्पवयीन मुले पोलिसांनी ताब्यात घेतली. आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. गणेश काळे हत्या प्रकरणाचा तपास कोंढवा गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. ताब्यात घेतलेले आरोपी हे संशयित असून त्यांची चौकशी झाल्यावर खरे आरोपी निष्पन्न होतील.
गणेश काळे कोण? त्याचा गुन्हेगारी इतिहास काय?
मयत गणेश काळे हा गायकवाड टोळीतील नंबरकारी समीर काळे याचा भाऊ आहे. वनराज आंदेकर याला मारण्यासाठी शस्त्रास्त्रे पुरविल्याचा समीर काळे याच्यावर आरोप आहे. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्यावर्षीय वनराज आंदेकर याची गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत हत्या केली होती. वनराज याच्या खुनात वापरलेली पिस्तूल समीर काळे याने मध्यप्रदेशातून आणल्याचे पोलिस तपासात पुढे आले होते. समीर काळे हा सध्या येरवाडा तुरुंगात आहे.
गणेश काळे हा रिक्षा चालक आहे. रिक्षा चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. तो येवलेवाडी परिसरात राहायला आहे. गणेश काळे याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये एक गुन्हा देखील दाखल आहे.
गणेशचा खून टोळीयुद्धाचा भाग आहे का?
पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढणे हे घाईचे ठरेल. मात्र हा खून टोळीयुद्धाचा भाग आहे का, याचा तपास सुरू आहे. आरोपींना शोधण्यासाठी १० पथके रवाना केली आहेत. फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण केले आहे.
