सुस्मिता भदाणे, प्रतिनिधी, मुंबई: मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली. ही सुनावणी कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर पार पाडली. कोर्टाने जे काही सुरू आहे, ते बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. कोर्टाने दुपारी 3 वाजेपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. पुढील सुनावणी 3 वाजता होणार आहे.
advertisement
मराठा आंदोलनकर्त्यांकडून काल रात्री आझाद मैदानात आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलीस परवानगीसाठी अर्ज केला होता. आज सकाळी मुंबई पोलिसांनी हा अर्ज फेटाळला आणि परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे यांना पोलिसांनी नोटीसही बजावली. तर मराठा आंदोलनकर्त्यांच्यावतीने अॅडव्होकेट सतीश मानेशिंदे यांनी आज युक्तिवाद केला.
आजच्या सुनावणीत खंडपीठाने म्हटले की, फक्त ५ हजार लोकांना आझाद मैदानावर परवानगी ..मग उर्वरित लोकांना तुम्ही सुचीत करायला हवं . ५० हजार ते १ लाख लोक मुंबईतील रस्त्यांवर आले आहेत.. प्रसार माध्यमांच्या मदतीने ज्यादा लोकांनी परत जावे असे आम्ही सुचीत केले. वाहनांची वाहन मालकांची माहीत तुम्हाला द्यावी लागेल असे म्हटले. त्यावर ॲड सतीश मानेशिंदे यांनी म्हटले की, काही लोकांकडून त्रास होत आहे. त्यासाठी आम्ही माफी मागतो.
कोर्टाचा निर्वाणीचा इशारा...
त्यावर खंडपीठाने हे फारच गंभीर असल्याचे म्हटले. राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या का ? असा सवाल केला. मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही. आंदोलकांनी तात्काळ जागा रिकामी करावी, अन्यथा आम्हाला कारवाई करावी लागेल असा इशारा हायकोर्टाने दिला.
हायकोर्टाने सरकारच्या कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केले.कालच्या सुनावणी नंतर तुम्ही राज्य सरकारने काय काम केले असा सवाल केला. पोलिसांनी मोबाईल व्हॅनचा डेटा सादर करावा. तुम्ही लाऊडस्पिकरच्या मदतीने अनाऊसमेंट केली का असा प्रश्न करताना तुम्ही कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात अयशस्वी झालात अशी टिप्पणी केली.
आझाद मैदान हे 3 वाजेपर्यंत रिकामं करा आणि 3 वाजता होणार्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने अॅड. सतीश मानशिंदे यांना दिले. राज्य सरकारने परवानगी नाकारली तरी जर मैदानावर आंदोलन सुरू असेल तर हे पहिल्यांदा हटवा अशी सक्त सूचनाही खंडपीठाने दिली. गरज भासल्यास आम्ही स्वत: त्या ठिकाणी येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ असे हायकोर्टाने म्हटले.
