खरं तर, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यातील काही नगर परिषदा आणि नगर पंचायतीचं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. उर्वरित ठिकाणी आज म्हणजे २ डिसेंबरला मतदान पार पडत आहे.
advertisement
ज्या ठिकाणंचं मतदान पुढे ढकललं आहे. तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. राज्यातील सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचं निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे.
त्यामुळे आज मतदान होत असलं तरी याचा निकाल कधी लागणार? याबाबत सस्पेन्स वाढला आहे. २ डिसेंबरच्या निवडणुका ठरल्यानुसारच होतील, तर उर्वरित २० डिसेंबरला होतील. मात्र, दोन्ही टप्प्यांच्या निवडणुकांचे निकाल एकत्रित जाहीर करायचे की वेगवेगळे याचा अंतिम निर्णय आज दुपारी १२.३० वाजता निवडणूक आयोग काय निवेदन करणार? यावरून स्पष्ट होणार आहे.
