जळगाव : जिल्ह्यातील कासनवाडा गावात शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. युवराज कोळी असे हत्या करण्यात आलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. युवराज कोळी हे सकाळी आपल्या शेतात गेले असताना तीन ते चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेनंतर माजी उपसरपंचाचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला व जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
advertisement
उपसरपंच असताना गावात चांगले काम करत असल्याने त्याचा राग धरून युवराज कोळी यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या बहिणीने केला असून हत्या करणाऱ्या आरोपींकडून मुलांना व आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप मृत युवराज कोळी यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित अद्याप फरार आहेत. या घटनेची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील त्यांनी देखील जिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाईकांचे सांत्वन केले.
.... तर युवराज कोळींचा जीव वाचला असता
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या त्या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती तर कदाचित जळगावमधील उपसरपंचाची हत्या झाली नसती अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दिली. तसेच राज्यात पोलिसांचा धाक हा राहिला नसून महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला आहे. या घटनेत नेमकी हत्या कशामुळे झाली याचे कारण अद्याप समोर आलेले नसून झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
