राज्यात मतचोरीविरोधात विरोधी पक्षांचा एल्गार सुरू असतानाच, महायुतीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी थेट आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा सांगितल्या आहेत. 5 नोव्हेंबर ते 31 जानेवारी दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण होण्याचा अंदाज दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महापालिका 15 जानेवारीला मतदान पार पडणार
advertisement
दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. मात्र, आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका जाहीर होणार आहेत. तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू असतानाच महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे. 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका पूर्ण होतील.
31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश
सुप्रीम कोर्टाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापासून निवडणूक आयोगाने अंग झटकून कामाला सुरुवात केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी गट व गणांची रचना, आरक्षण व मतदार यादीचे काम जवळपास पूर्ण केले आहे तर नगरपालिकेची प्रभाग रचना, आरक्षण सोडत, तर अंतिम मतदार यादी 31ऑक्टोबरला जाहीर केली आहे.
तीन वर्षापासून निवडणुका रखडलेल्या
वळसे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हं दिसत आहेत. कारण निवडणूक आयोगाच्या औपचारिक घोषणेपूर्वी अशा प्रकारे संभाव्य वेळापत्रक सांगितल्याने विविध पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील तीन रखडल्याने नगरपालिका, महापालिकावर प्रशासक नेमले आहे. 2017 सालापासून निवडणुका रखडलेल्या आहेत.
