मनोज पाटील हे भारतीय सैन्यात जवान आहेत. त्यांचा सोमवारी ५ मे रोजी दोन्ही बाजुंच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह पार पडला. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना बॉर्डरवरून बोलावणं आलं. अंगावरची हळद वाळत नाही, तोपर्यंत ते देशसेवेसाठी पुन्हा सेवेत परतले आहेत. पाच मे रोजी लग्न झालेल्या मनोज यांना सात तारखेला देश सेवेसाठी तत्काळ हजर राहण्याचा कॉल आला. कुठलाही विचार न करता मनोज पाटील यांच्या अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह जवान आज (८ मे) सीमेवर रवाना झाले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील नाचणखेड़े येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी मनोज सुट्टी घेऊन आपल्या गावी आले. दोन्ही कुटुंबीयांनी जोरदार लग्नाची तयारी केली. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांना कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणं आले आहे.
कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच देशसेवेच्या कर्तव्यावर जावे लागल्याचा मनोज यांना गर्व आहे. देशापेक्षा काहीही मोठे नाही, अशा भावना मनोज यांनी व्यक्त केल्या. मनोज यांची पत्नी यामिनी यांनी देखील या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रया दिली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच जवानांच्या सुट्ट्या शासनाने रद्द केल्यामुळे घरी परतलेल्या जवानांना पुन्हा देश सेवेसाठी हजर राहावे लागत आहे. यातच स्वतःच्या लग्नासाठी रजेवर आलेले मनोज देशाच्या कर्तव्यासाठी रवाना झाले आहेत.
