बालपणापासूनच कलेक्टर व्हायचे आणि लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसायचे ठरवलेले स्वप्न अखेर विजयने पूर्ण केले आहे. त्याला आयपीएसची परिक्षा द्यायची होती, त्यातही तो नक्कीच यशस्वी होईल, अशी प्रतिक्रिया विजय वडील नागनाथ लमकाणे यांनी दिली. एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आलेल्या आपल्या लेकाविषयी वडील भरभरून बोलत होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी गावातील विजय लामकाने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले. चौथीत असताना शिष्यवृत्ती परीक्षा दिली. त्यातही त्याचे नशीब फळफळले.
advertisement
एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि पात्रता गुण जाहीर केले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 27 ते 29 मे दरम्यान घेण्यात आली होती. त्यानंतर मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 1516 उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखती 30 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आल्या. या मुलाखती संपल्यानंतर गुरूवारी रात्री अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विजय लमकाणे यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकवला असून, हिमालय घोरपडे हे राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आले आहेत. रवींद्र भाबड हे तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, विजय लमकाणे यांची यापूर्वीही एमपीएससीच्या माध्यमातून विविध सेवांसाठी निवड झाली आहे. सध्या ते पुण्यातील 'यशदा' ट्रेनिंग सेंटरमध्ये गटविकास अधिकारी पदाचे प्रशिक्षण घेत आहेत. विजय वयाच्या दहाव्या वर्षापासूनच 'मला कलेक्टर व्हायचे आहे, मी लाल दिव्याच्या गाडीत बसणार' असं म्हणायचा. त्यावर बहीण म्हणायची 'तू शिक्षक किंवा इंजिनिअर झाला तरी बस' यावर दोघांची भांडणे व्हायची. परंतु विजय कलेक्टर होण्यावर ठाम असायचा.
लहानपणापासूनच कलेक्टर व्हायचे ध्येय बाळगले होते. त्यानुसार परिश्रम घेत सातत्य ठेवल्याने यश मिळवले. अनेक मान्यवरांच्या व्याख्यानांना जायचो. यामुळे माइंड सेट तयार होत गेला. स्पर्धा परीक्षांमध्ये माइंड- सेट, आजूबाजूचे वातावरण आणि सातत्य या गोष्टी महत्वाच्या असतात, अशी प्रतिक्रिया विजय लामकाने यांनी माध्यमांना दिली.
