मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला अपघात झाल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ असलेले जुने रेल्वे क्रॉसिंग तोडून धान्याचा ट्रक थेट ट्रॅक वर आल्याने मुंबई अमरावती एक्सप्रेस ट्रकला धडकली
बोदवड रेल्वे स्थानकावर पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात घडला. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. तर, जखमी-दुखापत झालेल्यांवर उपचार सुरू आहेत.
advertisement
मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला झालेल्या अपघातामुळे पहाटे 4 वाजल्यापासून मुंबई हावडा मार्गावरील अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
रेल्वे वाहतूक विस्कळीत...
बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातामुळे मुंबई हावडा मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागपूर व हावडाकडे जाणाऱ्या अनेक गाड्या भुसावळ जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवल्या आहेत. तर हावडा नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या मलकापूर व अकोला रेल्वे स्थानकावर थांबवल्या आहेत.
गेल्या तीन तासापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अपघातस्थळी रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
जळगाव स्टेशनवर अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे. तर, भुसावळ रेल्वे स्टेशनवर शालिमार एक्सप्रेस, भुसावळ बडनेरा पॅसेंजर, हमसफर एक्सप्रेस थांबवण्यात आली असून मलकापूर रेल्वे स्टेशनवर हावडा एक्सप्रेस थांबली आहे.
