कोणकोणत्या पदांसाठी निवडणूक होणार?
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी सात अर्ज आले होते. परंतु अर्ज माघारीच्या दिवशी दिग्गज राजकारण्यांनी आपापले अर्ज माघारी घेऊन अजिंक्य नाईक यांच्यापुढचे अडथळे दूर करून अध्यक्षपदासाठी त्यांचा मोकळा केला. आता उपाध्यक्षपदासाठी पवार-शेलार पॅनलमधून जितेंद्र आव्हाड विरुद्ध नवीन शेट्टी यांच्यात लढत होणार आहे. खजिनदारपदासाठी अरमान मलिक विरुद्ध सुरेंद्र शेवाळे अशी लढत होईल. सचिवपदासाठी शाह आलम शेख विरुद्ध डॉ उन्मेष खानविलकर आणि सहसचिवपदासाठी गौरव पायडे विरुद्ध निलेश भोसले अशी लढत होणार आहे.
advertisement
जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी आशिष शेलार यांचा प्रचार!
"आजपर्यंत आम्ही सगळ्यांनीच शरद पवार साहेब असो, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, या सगळ्यांच्याच नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. यामध्ये पक्षीय भेद कधीच न बाळगता ही निवडणूक आपण लढत आहोत. म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत, उद्या ३ ते ६ वाजेपर्यंत मतदान करून 'पवार-शेलार' पॅनलच्या उमेदवारांना विजयी करा", असे आवाहन आशिष शेलार यांनी केले.
MCA निवडणुकीतील मतदार कोण? किती जण मतदान करणार?
मुंबई क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीसाठी एकूण २७५ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये २१० मैदान क्लब, ७७ कार्यालय क्लब, शाळा आणि महाविद्यालय क्लबचे ३६ प्रतिनिधी, ५२ माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू मतदान करतील. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, आदित्य ठाकरे, प्रताप सरनाईक आदी नेतेही मतदानास उत्सुक आहेत.
अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड निश्चित
मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची सलग दुसऱ्यांदा निवड होणार आहे, आज दुपारी त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल. अध्यक्षपदासाठी यंदा अनेक दिग्गज राजकारणी नेत्यांनी अर्ज दाखल केले होते. परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत योग्य वाटाघाटी करून नाईक यांच्या मार्गातले अडथळे दूर केले गेले. अर्ज माघारी घ्यायला पाच-दहा मिनिटे शिल्लक असताना भाजप नेते प्रसाद लाड, सेना नेते विहंग सरनाईक, क्रिकेटर डायना एडल्जी यांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला.
