वर्धा : टपाल खात्यात वरिष्ठ संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या महिला अधिकाऱ्याचा मे महिन्यात नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल अधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या छळामुळे आटो इम्युनिटी डीसऑर्डर झालाय. यात तिचा मृत्यू झाला असल्याचा खळबळजनक आरोप मृत पावलेल्या महिला अधिकाऱ्याच्या पतीने केला आहे. पत्नीच्या मृत्यूपासून आपण टपाल खात्यातील अनेक अधिकारी, राज्यातील सर्व मंत्री, केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रपती यांच्यासोबत मेलवरून पत्रव्यवहार केलाय. पण न्याय मिळाला नसल्याचा आरोप पती पुष्पक मिठे याच्याकडून होत आहे.
advertisement
मुळ वर्ध्याच्या असलेल्या महिला अधिकारी वसुंधरा गुल्हाने-मिठे या 2014 च्या बॅचमधील युपीएससी पास आउट होत्या. त्यांची बदली नागपूर येथे झाली. तर ज्यांच्यावर आरोप होतोय त्या महिला अधिकारी शोभा मधाळे टपाल खात्यात पोस्ट मास्टर जनरल म्हणून कार्यरत आहे. पाच दिवसापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमादरम्यान स्टेजवर जागेसाठी दोन महिला अधिकाऱ्याची धुसफूस समोर आली होती. त्यात ही महिला अधिकारी शोभा मधाळे देखील दिसून आली.
टपाल खात्यात उच्च अधिकारी असलेल्या वसुंधरा गुल्हाने -मिठे यांनी नागपूर येथे 2024 च्या जानेवारी महिन्यात संचालक म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून पोस्ट मास्टर जनरल यांच्याकडून वारंवार अपमान, टोचून बोलणे, मानसिक त्रास दिला जात होता. सततच्या त्रासामुळे वसुंधरा यांना आटो इम्युनिटी डिसऑर्डर आजार झाला. 7 मे 2025 रोजी नागपूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. 16 मे 2025 रोजी त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप वसुंधरा मिठे यांचे पती पुष्पक मिठे यांनी केला.
'माझ्या पत्नीचा मृत्यू वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या मानसिक छळामुळे झाला असल्याचा आरोप पती पुष्पक मिठे यांनी केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री तसंच राज्यातील सर्व मंत्र्यांना आपण पुराव्यानीशी ई मेल करून न्याय मागितल्याचे पती पुष्पक यांनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतीरादित्य शिंदे यांना देखील मेल करून न्याय मागितला. पण, अद्याप मला न्याय मिळाला नसल्याचे पती पुष्पक मिठे म्हणतो आहे. शोभा मधाळे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील कार्यक्रमात दोन महिला अधिकाऱ्यांची मंचावरील धुसफूस सगळीकडे व्हायरल झाली होती. यातील एक अधिकारी या शोभा मधाळे या होत्या. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शोभा मधळे या चर्चेत आल्या आणि ते नेहमीच वादात राहत असल्याचा आरोप पुष्पक मीठे यांच्याकडून करण्यात आलाय.
