देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नाला उत्तर
फलटणच्या महिला डॉक्टर प्रकरणातील आरोपींवर मकोका लागणार का? आरोपींची तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का? महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था उभी केली जाणार का? असा सवाल काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाला उत्तर दिलं.
महिलेनेच हातावर सुसाईड नोट लिहिली
advertisement
आपण महिलांच्या बाबतीत 60 दिवसात चार्टशीट दाखल करणार होतो. सदर महिला डॉक्टर या 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने रुजू होत्या. फॉरेन्सिकच्या रिपोर्टनुसार डॉक्टर महिलेनेच हातावर सुसाईड नोट लिहिली होती. आरोपी बदनेने डॉक्टर महिलेची फसवणूक करून तिचं शारिरीक शोषण केलं होतं, अशी धक्कादायक माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली. त्यातून लग्नाचं अमिष दाखवलं गेलं. शोषण झाल्यावर बदनेने वेगळी भूमिका घेतली, असंही फडणवीसांनी सांगितलं.
फॉरेन्सिक पुरावे जमा केले
या प्रकरणात जेवढी नावं घेण्यात आली तेवढ्या सगळ्यांची चौकशी करण्यात आली आहे. काही लोकांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक गोष्टीच राजकारण चालत नाही. या प्रकरणात पारदर्शी पद्धतीने चौकशी झाली. कुणालाही सोडलं गेलं नाही. सर्वांची चौकशी होईल. पोलिसांकडे महिलेचे हॉटेलवर जाईपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही आहेत. फॉरेन्सिक पुरावे जमा केले आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं.
दुसऱ्या आरोपीने देखील शोषण केलं
दरम्यान, दुसऱ्या आरोपीने देखील शोषण केलं होतं. त्यामुळे डॉक्टर महिलेने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. या प्रकरणात दुसरा कोणताही अँगल नाही तिने आत्महत्याच केली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी मृत महिलेच्या कुटुंबीयातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी पीडित कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.
