घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, बचाव पथक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याने पोलिसांनी तत्काळ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरूवात केली. बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभागाने परिसरात शेकडो मीटरचा घेराव घातला आहे. पिंजरा लावून पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. परिसरात ड्रोनच्या सहाय्यानेही शोधमोहीम राबवली जात आहे.
advertisement
स्थानिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता
संत कबीर नगर आणि वनविहार कॉलनी परिसरात ही घटना दुपारच्या वेळी घडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले. काही नागरिकांनी बिबट्याचे व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अचानक वन्यप्राणी नागरी वस्तीत आल्याने स्थानिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता व्यक्त होत आहे.
बिबट्याचा शोध सुरु
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसपासच्या डोंगराळ परिसरातून भटकत हा बिबट्या नागरी भागात शिरला असावा. सध्या पथके त्याच्या अचूक ठिकाणाचा शोध घेत आहेत. नागरिकांनी घाबरू नये, घराबाहेर गर्दी करू नये आणि वनविभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, घटनेमुळे गंगापूर रोड परिसरात वाहतूक विस्कळीत झाली असून पोलिसांनी काही भागांत तात्पुरती नाकेबंदी लागू केली आहे. बिबट्याचा शोध सुरु असून लवकरच त्याला सुरक्षितपणे पकडले जाईल, असा विश्वास वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
