येत्या 2027 या वर्षात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरवला जाणार आहे. या कुंभमेळानिमित्त नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. नाशिक महानगरपालिकेत गट 'क' श्रेणीसाठी अभियांत्रिकी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 114 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबर 2025 ते 1 डिसेंबर 2025 या काळात ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. सोबतच अर्ज शुल्क भरू शकणार आहेत. ही भरती थेट पद्धतीनेच केली जाणार असून पात्र उमेदवारांना अभियांत्रिकी सेवा पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नोकर भरतीसाठी इंजिनिअर शाखेमध्ये शिक्षण पूर्ण केलेले असावे अशी आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेकडून इंजिनियर पूर्ण केलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावा असे आवाहन केले आहे.
advertisement
नाशिक महानगर पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीची PDF बातमीमध्ये देण्यात आली आहे. त्यासोबतच ऑनलाईन अर्जाची लिंक सुद्धा देण्यात आली आहे. भरतीमध्ये सहायक अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी), कनिष्ठ अभियंता (विद्युत, स्थापत्य, यांत्रिकी, वाहतूक) आणि सहायक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत) यांसारख्या विविध अभियांत्रिकी पदांचा समावेश आहे. या पदांसाठी 114 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. उमेदवारांना परीक्षेच्या तारखेच्या सात दिवस आधी उपलब्ध होतील. सोबतच परीक्षेची तारीख नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. https://nmc.gov.in/ या वेबसाईटवर उमेदवारांना माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, नोकर भरती केली जाणाऱ्या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागेल.
खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) शुल्क 1000 रुपये आहे, तर अनुसूचित जाती- जमाती आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी शुल्क 900 रुपये आहे. शैक्षणिक पात्रता पदांनुसार बदलणारी आहे. सहायक अभियंत्यांसाठी विद्युत, स्थापत्य आणि यांत्रिकी या अभियांत्रिकी शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. कनिष्ठ अभियंत्यांसाठी संबंधित अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी किंवा पदविका आवश्यक आहे. स्थापत्य आणि यांत्रिकी पदांसाठी किमान 3 वर्षांचा अनुभव, तर विद्युत पदासाठी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सर्व पदांसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य आहे. सहायक कनिष्ठ अभियंत्यांसाठी स्थापत्य किंवा विद्युत अभियांत्रिकी पदवी/पदविका आणि ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 38 वर्षे आहे, तर अनुसूचित जाती- जमाती उमेदवारांसाठी 43 वर्षे आहे. दिव्यांग (45 वर्षे), माजी सैनिक (45 वर्षे अधिक सेवा कालावधी), प्रकल्प बाधित (45 वर्षे), भूकंप बाधित (45 वर्षे) आणि अर्धवेळ कर्मचारी (55 वर्षे) यांसारख्या विविध प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम तारखेनुसार मोजली जाईल.
