बसचा प्रवास नव्हे, तर वऱ्हाडींची 'कसोटी'!
फेब्रुवारी 2023 मध्ये नांदगाव येथील सतीश जगन्नाथ बिडवे यांनी लग्नासाठी 22 हजार रुपये आगाऊ भरून बस आरक्षित केली होती. मात्र, लग्नाच्या दिवशी बस तब्बल 45 मिनिटे विलंबाने आली.
चुकीचा मार्ग: विलंबानंतर बस सुरू झाली, पण चालकाला महामंडळाकडून चुकीचा पत्ता (डेस्टिनेशन) देण्यात आल्याने बस नियोजित ठिकाणी न जाता नस्तनपूर येथे पोहोचली. 50 किलोमीटर अंतर पार केल्यानंतर बस रस्त्यातच बंद पडली.
advertisement
बोरिवली ते नाशिक आता AC प्रवास, ST चा मोठा निर्णय, पाहा वेळापत्रक
अडीच तासांची प्रतीक्षा
तक्रारदारांनी संपर्क साधूनही पर्यायी बस मिळण्यासाठी वऱ्हाडींना तब्बल अडीच ते तीन तास रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागले. सर्व प्रकारामुळे वऱ्हाडी लग्नाच्या स्थळी तीन तास उशिरा पोहोचले आणि लग्न लागण्याचा शुभमुहूर्त टळला.
एसटीचा दावा फेटाळला
रस्ता खराब असल्याने बसचा 'एक्सेल जाम' झाल्याचा बचावात्मक दावा एसटी महामंडळाने ग्राहक आयोगासमोर केला. मात्र, अध्यक्षा मंदाकिनी भोसले आणि सदस्य कविता चव्हाण यांच्या खंडपीठाने हा दावा फेटाळून लावला.
आयोगाचे निरीक्षण: "तक्रारदाराने आरक्षित केलेल्या मार्गाची आधीच माहिती असतानाही योग्य स्थितीत वाहन न पुरवणे ही सेवेतील स्पष्ट कमतरता आहे. बस कार्यक्षम (Fitness) नव्हती," असे आयोगाने स्पष्ट करत महामंडळाला दोषी ठरवले. तसेच शारीरिक आणि मानसिक त्रासापोटी सतीश बिडवे यांना एक महिन्याच्या आत 50,000 रुपये नुकसानभरपाई आणि 5,000 रुपये तक्रार अर्ज खर्च देण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहेत.
जबाबदारी निश्चित होणार
या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, "या प्रकरणाबाबत मध्यवर्ती कार्यालयातील विधी शाखेकडून कार्यवाहीबाबत मार्गदर्शन मागविण्यात येईल. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल."
ग्राहक आयोगाच्या या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या गलथान कारभारावर जोरदार टीका होत असून, प्रवाशांना वेळेवर आणि योग्य सेवा देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.






