मिरज शासकीय रुग्णालय इथं निखिल कलगुडगी खुनातील आरोपींच्यावर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराला वेळीच रिव्हाल्व्हरसह पोलिसांनी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. या ठिकाणी आणखीन तीन संशयित मात्र पळून जाण्यास यशस्वी झाले आहेत.
रुग्णालयात घेणार होते बदला
निखील कलगुटगी याचा जुन्या वादातून निर्घृण खून झाला होता. यामध्ये 13 आरोपींना या खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या खुनातील आरोपी सलीम पठाण, चेतन सुरेश कलगुटगी, विशाल बाजीराव शिरोळे, सुहेल जमीर लांचोळी यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या आरोपींना आज बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालय इथं मिरज शहर पोलीस घेऊन गेले होते, त्यावेळी या ठिकाणी सलीम पठाण चेतन कलगुडगी याच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. यामध्येच आरोपींवर खुनी हल्ला करण्याच्या उद्देशाने काही हल्लेखोर आले होते. यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्या तरुणाला हल्ला करण्याच्या आधीच ताब्यात घेऊन त्यांच्या कडून एक रिव्हॉल्वर जप्त केली आहे.
advertisement
हल्लेखोरासोबत आलेले साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. यावेळी मिरज उपविभागी पोलीस अधिकारी प्रणील गिलडा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्यासह मोठा पोलीस फौज फाटा यावेळी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाला होता, या प्रकरणी एकास अटक केली असून मिरज पोलिस अधिक तपास करत आहेत.
