रेल्वे विभागाची प्रतिक्रिया
रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाचोरा रेल्वे स्टेशनजवळ ही दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेस जागेवर उभी होती, तेव्हा आगीची अफवा पसरली आणि काही जणांनी उड्या मारायला सुरूवात केली. तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती, उड्या मारल्यानंतर प्रवासी बंगळुरू एक्सप्रेसखाली आले. संध्याकाळी 4 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनास्थळी 8 रुग्णवाहिका रवाना झाल्या आहेत. तसंच जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
advertisement
पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊवरून मुंबईला येत होती, तर बंगळुरू एक्सप्रेस भुसावळच्या दिशेने भरधाव वेगात चालली होती. तेव्हाच पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली, यानंतर पुष्पक एक्स्प्रेसमधल्या प्रवाशांनी चेन ओढून ट्रेन थांबवली. आगीच्या अफवेनंतर प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून धडाधड उड्या मारायला सुरूवात केली, पण समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत असल्याचं प्रवाशांना दिसलं नाही आणि हा भीषण अपघात झाला आहे.
कशी पसरली अफवा?
प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने येत असताना रूळ आणि चाकांचं घर्षण झाल्यामुळे ठिणग्या पडत होत्या. या ठिणग्या ट्रेनमधील प्रवाशांनी पाहिल्या आणि त्यांना आग लागल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी ट्रेनची चेन ओढली. आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी धावपळ करायला सुरूवात केली आणि दरवाजातून उड्या मारायला सुरूवात केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलं दु:ख
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दु: ख व्यक्त केलं. "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे."
