थंडीचं आगमन उशिराने
देशातील बहुतांश भागांत नोव्हेंबर महिन्यात पाऊस राहणार आहे. बदलत्या हवामानाचा परिणाम म्हणून अवकाळी पाऊस असेल. महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. यामुळे थंडीचं आगमन उशिरा होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होणार आहे. हिमाचल आणि आसपासच्या भागांवर त्याचा परिणाम होईल. उत्तरेकडून येणारे वारे थंड वारे आणि अरबी समुद्रात डिप्रेशनमुळे विचित्र वातावरण होऊ शकतं.
advertisement
सायक्लोनिक सर्क्युलेशनचं संकट
देशाच्या अनेक भागांमध्ये सध्या सक्रिय असलेल्या हवामान प्रणालींमुळे मोठा बदल दिसून येत आहे. दोन मुख्य हवामान प्रणाली सध्या सक्रिय असून, त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र आणि गुजरातसह अनेक राज्यांवर होणार आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रातील 'डिप्रेशन' आणि उत्तर-पश्चिम झारखंडजवळील कमी दाबाचे क्षेत्र यामुळे पुढील २४ ते ४८ तास अनेक राज्यांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. 3 नोव्हेंबरपासून उत्तरेकडे सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत आहे. त्याचा परिणाम देखील हवामानावर होणार आहे.
महाराष्ट्रावर पावसाचं संकट
नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र आणि गोव्यात पाऊस राहणार आहे. कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार आहे. पावसामुळे याच महिन्यात कडाक्याच्या थंडीची प्रतीक्षा लांबणीवर पडेल. याचा परिणाम पिकांवर देखील होणार आहे.
ला निनोची स्थिती, कधी येणार थंडी
प्रशांत महासागरात ला निनोची स्थिती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कायम राहणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये तीव्र थंडी येण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. महाराष्ट्रात पावसाची तीव्रता कमी असली तरी ढगाळ वातावरण राहू शकतं. रविवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही पट्ट्यात पाऊस राहण्याची शक्यता आहे.
