यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी इंदुरीकर महाराज यांना साथ दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहित महाराजांना "फेटा खाली ठेवू नका" असा संदेश दिला आहे. "महाराजांनी वर्षानुवर्षे वारकरी समाजासाठी, महिलांसाठी आणि तरुणांसाठी अपार काम केले आहे. समाजप्रबोधनातून ते हजारो कुटुंबांना चांगल्या विचारांची दिशा देत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावरील काही विकृत टिप्पणी करणाऱ्यांकडे लक्ष न देता महाराजांनी आपले कार्य सुरू ठेवावे," असं ठोंबरे यांनी म्हटलं.
advertisement
रुपाली पाटील ठोंबरे फेसबूक पोस्टमध्ये काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे पाटील फेसबूक पोस्टमध्ये म्हणाल्या, " इंदुरीकर महाराज राम कृष्ण हरी...तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही... महाराज तुम्ही सोशल मीडियाच्या विकृत लोकांमुळे व्यथित झालात. साहजिकच होणार... पण आपण आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने सिद्ध आहात. या सोशल मीडियाच्या विकृत छपरी, जे माणूस नावावर कलंक आहेत. यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये. आपण आपल्या वारकरी प्रबोधनातून, कीर्तन, भजनातून समाजातील माता, भगिनी, बंधूंसाठी अत्यंत मौल्यवान कार्य केले आहे. अध्यात्मिक शांती देत आहात. तेही या युगाशी समतोल साधून केले आहे. त्यामुळे आपण अजिबात व्यथित होऊ नका.
तुमच्यासारखे महाराज नसतील घर घरातील बिघडलेले स्त्री, पुरुष चांगल्या मार्गावर येणार कसे? त्यांना सदबुद्धी, चांगले विचार, चांगले कर्माचा रस्ता सांगणार कोण? तुम्ही फेटा खाली उतरायचा नाही. तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे. तुमचे कुटुंब म्हणून तुमच्या कुटुंबतील मी लेक आहे. आमच्या भगिनीबद्दल कोण बोलत असेल तर त्या विकृत माणसांकडे तुम्ही दुर्लक्ष करा. त्यांची विकृती ठेचून काढू. अजिबात व्यथित होऊ नका आणि फेटा खाली ठेवायचा नाही. ही माझी आपणास लेक म्हणून विनंती आहे, अशी भावनिक साद रुपाली ठोंबरे यांनी घातली आहे.
