आंचल मामीडवारने सांगितलं की, १ डिसेंबरला सक्षमचा वाढदिवस होता. वाढदिवसानंतर तो मला घेऊन जाणार होता. पण वाढदिवसाच्या चार दिवस आधी त्याची हत्या करण्यात आली. मी अधिकारी बनावं, हे सक्षमचं स्वप्न होतं. यासाठी तो मला शिक्षणात मदत करत होता. आता त्याचं स्वप्न मी पूर्ण करणार, असंही आंचलने सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली. घटनेच्या दिवशी सकाळी आंचलचा लहान भाऊ तिला पोलीस स्टेशनला घेऊन गेला होता. 'सक्षमविरोधात तक्रार दे,' असा दबाव तिच्यावर टाकला. मात्र, आंचलने पोलिसांसमोर स्पष्ट सांगितले की, तिला तक्रार द्यायची नाही. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्याने आंचलच्या भावाला उद्देशून, 'रोज मारामाऱ्या करून येतोस, बहिणीचं ज्याच्यासोबत प्रेम आहे त्याला मारून ये' असे सांगितले. त्यामुळे पोलिसानेच भावाला भडकावल्याचा आरोपही आंचलने प्रसार माध्यमांशी बोलताना केला.
विशेष म्हणजे यापूर्वी आंचलने सक्षम विरोधात बलात्कार आणि विनयभंगाची तक्रार दिली होती. पण ही तक्रार वडील आणि भावांच्या दबावातून दिली होती. १८ वर्षे पूर्ण होताच तिने कोर्टात समक्ष जाऊन सक्षमच्या बाजुने साक्ष दिली होती. आता पुन्हा तिच्यावर सक्षमविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव होता. पण तिने गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर आंचलचे कुटुंबीय तिला देवदर्शनाच्या नावाखाली आजोळी घेऊन गेले तर, दुसरीकडे आंचलचे वडील गजाजन मामीडवार आणि तिच्या दोन भावांनी सक्षमची निर्घृण हत्या केली.
