मुंबईतील मलबार हिल परिसरातील 'मेघदूत' हा शासकीय बंगला शंभूराज देसाई यांना मंत्री म्हणून मिळाला. शंभूराज देसाई यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब देसाई हे राज्याचे माजी गृहमंत्री होते. बाळासाहेब देसाई हे गृहमंत्री असताना त्यांना मेघदूत हा बंगला मिळाला होता. याच बंगल्यात शंभूराज देसाई यांचा जन्म झाला. मेघदूत बंगल्यावर शंभुराजे देसाई यांचा जन्म झाला होता. पहिली पाच वर्षे त्यांनी याच वास्तूत घालवली होती. त्यामुळे आज इतक्या वर्षांनी पुन्हा याच घरात पाऊल ठेवताना त्यांच्या मनात साठलेल्या जुन्या आठवणी समोर आल्या आणि भावनांचा बांध फुटला.
advertisement
गृहप्रवेशावेळी भावनांचा कल्लोळ
गृहप्रवेशाच्या वेळी शंभुराजे देसाई यांच्या मातोश्रीही उपस्थित होत्या. घराच्या उंबरठ्यावर पाऊल टाकताच आईच्या आणि मुलाच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. संपूर्ण देसाई कुटुंब या क्षणाने भावूक झालं होतं. शंभुराजे देसाई म्हणाले, "‘मेघदूत’ हे केवळ सरकारी निवासस्थान नाही. इथे माझं बालपण गेलेलं आहे, माझे आजोबा आणि वडिलांचे पदकार्य सुरू झालं होतं. आज मी या वास्तूत पुन्हा पाऊल ठेवतोय, हे क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
शंभूराज देसाई यांच्या मातोश्री विजयादेवी शिवाजीराव देसाई यांनी आठवणींना उजाळा देताना सांगितले की, मंत्री शंभूराज देसाई याचा जन्म या बंगल्यातला आहे. मला त्याला कलेकटर करायचं होतं. मात्र तो आज कलेक्टरपेक्षा मोठा झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शंभूराज आमदार झाला, त्यानंतर मंत्री झाला तेव्हा आम्हाला पावनगड बंगला मिळाला होता. पण मी विचारायचे की मेघदूत बंगला मिळेल का? पण, त्याने आईची इच्छा पूर्ण केली. आज त्यांचे वडिल असते तर आनंद झाला असता. अनेक आठवणी या बंगल्याशी आहेत. घरात प्रवेश करताना पहिली आठवण बाळासाहेब आणि ताईसाहेबांची आली. आमच्यावेळी हा बंगला ब्रिटिश कालिन होता अशी आठवणही शंभूराज देसाई यांच्या मातोश्रींनी सांगिलतल्या.
शंभुराजे देसाई यांनी म्हटले की, आज मी मेघदूत बंगल्यावर राहायला आलो. 1966 साली माझे आजोबा गृहमंत्री असताना या बंगल्यात माझा जन्म झाला. या बंगल्यात मी लहानपण घालवलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली. 1965 साली याच बंगल्यावर माझ्या आईचा गृहप्रवेश झाला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली. मी टीवाय बीकॅाम शिकत होतो, तेव्हा कुटुंबाची राजकीय जबाबदारी माझ्यावर आली. 29 डिसेंबर 1996 लाख मला चेअरमन केले, त्यावेळी 20 वर्ष वय होते. त्यावेळी झालेली कमी वयातील बिनविरोध निवड हा माझा एक विक्रम असल्याचे शंभूराज यांनी सांगितले.
