निलंबित पीएसआय कासले याला ताब्यात घेतानाचा एक व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात पाच ते सहा पोलीस अधिकाऱ्यांचं पथक रणजीत कासलेला हॉटेलमधून घेऊन जाताना दिसत आहे. कासलेला ताब्यात घेतल्यामुळे आता संतोष देशमुख प्रकरणात नवीन माहिती उघड होऊ शकते.
कारण वाल्मीक कराडचं एन्काऊंटर करण्यासाठी आपल्याला कोट्यवधींची ऑफर देण्यात आली होती. ही ऑफर दुसरी तिसरी कुणी नव्हे तर धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट रणजीत कासले यांनी केला होता. आता पोलिसांनी कासलेला ताब्यात घेतल्याने देशमुख खून प्रकरणात नवा खुलासा समोर येण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर, रणजीत कासले हा गुरुवारी दिल्लीवरून पुण्यात आला होता. पुण्यात आल्यानंतर विमानतळावरच रणजीत कासले यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले होते. आपल्या खात्यात दहा लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचा दावा देखील केला होता. तसेच आपण पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडं अटक होणार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर तो पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबला होता. पण तो पोलिसांकडे सरेंडर व्हायच्या आधीच पहाटे पोलीस पथकाने हॉटेलमध्ये धडक घेत, कासलेला ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पाचच्या सुमारास पाच ते सहा पोलीस कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये दाखल झाले. त्यांनी सापळा रचून साखर झोपेत असलेल्या कासलेला ताब्यात घेतलं. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून पोलीस कासलेला घेऊन जाताना दिसत आहेत.
