वर्धा : आपल्या देशात दररोज शकडो रस्ते अपघात होतात. यातले बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी होतात. या रस्ते अपघातांमध्ये अनेकदा जनावरांनाही आपला जीव गमवावा लागतो. इतकंच नाही तर जनावरे आडवी आल्याने अनेकदा वाहन चालकांच्याही जीवाला धोका होतो. त्यामुळे वर्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने यावर उपाय म्हणून रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरांना जिओ टॅग युक्त रिफ्लेक्टर बेल्ट घालून देण्याचा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमामुळे रस्ता अपघातामध्ये होणारी जीवितहानी टाळण्यास मदत होईल. नाविन्यपूर्ण असा हा पहिलाच उपक्रम असून अपघात मुक्त जिल्हा हेच लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
advertisement
मोकाट जनावरांचे जिओ टॅगिंग
मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अॅप विकसित करून अॅपच्या आधारे जिओ टॅगिंग करून मोकाट जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. हा राज्यातील नाही तर देशातील असा पहिला उपक्रम असून अपघातमुक्त जिल्हा हेच लक्ष्य ठरविण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात परिवहन विभागामार्फत 5 हजार 500 रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महामार्गावरील गाव परिसरातील जनावरांना रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावण्यात येत आहे.
मनोरुग्णांनी तयार केला पळसाच्या फुलांचा रंग; अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश Video
जनावरांसह वाहन चालकांची होणार सुरक्षा
प्रत्येक प्राण्याला जिओ टॅग केले जाणार आहे. जबाबदारी सुनिश्चितकरण्यासाठी आणि उपक्रमाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी अॅपद्वारे सर्वसमावेशक फोटो घेतले जात आहेत. या बेल्टपैकी 5 हजार बेल्ट मोठ्या जनावरांना आणि 500 बेल्ट श्वानांना लावण्यात येणार आहे. आतापर्यंत 1 हजारांवर जनावरांना बेल्ट लावण्यात आले आहे. गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रिफ्लेक्टिव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळता येणार आहेत. नागरिकांनी शहरातील भागात मोठ्याप्रमाणात मोकाट श्वान तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या नव्या उपक्रमाने फुकट जनावरांसह वाहन चालकांची ही सुरक्षा होणार आहे आहेत.





