महाराष्ट्रात थंडीचा कडाका
येत्या दोन दिवसांत म्हणजेच ८ आणि ९ डिसेंबर या काळात विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या काही भागांत थंडीची लाट अनुभवायला मिळेल. विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येईल. त्यामुळे नागपूर, चंद्रपूर आणि अकोला येथील नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांतही थंडीची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत.
advertisement
मध्य प्रदेश, विदर्भात पहाटे दाट धुक्याची शक्यता
विदर्भाला लागून असलेल्या पश्चिम मध्य प्रदेशात ८ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून सकाळीपर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता आहे. दृश्यमानता२०० मीटरपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याने, महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या काळात विशेष खबरदारी घ्यावी लागेल. उत्तरेकडून महाराष्ट्रात येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात थंड हवामान राहणार आहे. कोकण पट्ट्यात मात्र गारठा कमी झाला आहे.
पूर्ण विदर्भात तापमानाचा पारा घसरला आहे. ८ अंश सेल्सियसपर्यंत किमान तापमानाची नोंद राज्यात करण्यात आली आहे. गोंदिया, नागपूर, अमरावतीमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. परभणी, गोंदिया, नागपूर, भंडारा, अमरावती, जेऊर ही राज्यातील सर्वात जास्त थंडीची ठिकाणं मागच्या २४ तासांत ठरली आहे. तर मध्य महाराष्ट्रातही तापमानात घट झाल्याने गारठा जाणवत आहे. वर्धा, भंडारा आणि गोंदिया तीन जिल्ह्यांसाठी पुढचे 48 तास यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका जास्त वाढण्याची शक्यता आहे.
किमान तापमानात मोठी घट अपेक्षित
पुढील तीन ते चार दिवसांत ८ ते ११ डिसेंबर पश्चिम भारतात रात्रीच्या किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसची घट होण्याची शक्यता आहे. यामुळे महाराष्ट्रात रात्रीची थंडी अधिक वाढेल. तर, देशाच्या उर्वरित भागांत आणि महाराष्ट्राच्या इतर भागात पुढील ६ ते ७ दिवस तापमानात मोठे बदल होण्याची शक्यता नाही. म्हणजे सध्या जसे हवामान आहे, ते काहीसे स्थिर राहील.
देशाच्या इतर भागांतील महत्त्वाचे बदल
देशातील इतर भागांबद्दल बोलायचं झाल्यास, ओरिसा, आसाम, मेघालय आणि संपूर्ण ईशान्येकडील राज्यांमध्ये ८ ते १२ डिसेंबर या काळात दाट धुक्याची स्थिती कायम राहील. तसेच, तामिळनाडू आणि अंदमान-निकोबार बेटांवर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ डिसेंबरनंतर देशातील कोणत्याही भागात थंडीची लाट नसेल, असा दिलासादायक अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
