जळगाव: ऐन लग्नसराईच्या काळात सोने-चांदीचे भाव रोज नवा विक्रम प्रस्थापित करत आहेत. एक तोळा सोन्याचे दर एक लाखांच्या वर गेले असून सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं आहे. सोन्याचे दर 70 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दरम्यान असल्यापासून भाव कमी होणार असल्याच्या चर्चा झडत आहेत. परंतु, जवळपास दीड ते 2 वर्षांच्या आत सोन्याचे दर 25 ते 30 हजार रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सोनं आवाक्याबाहेर गेल्याची चर्चा असून त्याचा फटका व्यापाऱ्यांना देखील बसल्याचे सांगितले जातेय. याबाबतच जळगावचे सराफा व्यावसायिक किरण खोंडे यांनी माहिती दिलीये.
advertisement
सराफा बाजार शांत
गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. तसेच रोज नवे अंदाज वर्तवले जात आहेत. त्यामुळे सराफा बाजारात खरेदी-विक्री कमीच असल्याचे दिसत आहे. या भाववाढीचा फटका सोन्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जळगावच्या सराफा बाजाराला देखील बसला आहे. सराफा बाजारात मोठ्या उलाढाली होत नसल्याचे व्यावसायिक खोंडे सांगतात.
अमेरिका आणि चीनची धोरणे
अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाने भारतातील सराफा बाजाराला फटका बसला आहे. ऐन लग्नसराईत सर्वसामान्यांची चिंता वाढली आहे. तसेच गुंतवणूकदारांचीही तीच अवस्था असल्याचे सराफा व्यावसायिक सांगतात. लग्न सराईत सोन्याची आवर्जून खरेदी केली जाते. परंतु, सोनं खरेदीसाठी दर कमी होण्याची वाट अनेकजण बघत आहेत. अशातच सोन्याच्या दरात पुन्हा वाढच झालीये. त्यामुळे सोनं मोडण्यासाठीही फार कुणी येत नाही. तसेच खरेदीही कमी प्रमाणातच सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
सराफा व्यावसायिकांवर संकट
बाजारात सोने देवाण घेवाण होत नसल्याने व्यापारी आपली दुकाने बंद करून बसले आहेत. सोने खरेदी होत नसल्याने बाजारात आलेले नवीन सोने घेण्यासाठी देखील व्यापारी पैसे जोडू शकत नाहीत. आता नवीन सोने घेऊन आपल्याकडे ठेवणे हे नुकसानकारक असल्याचे व्यापारी सांगत आहेत. तसेच सोने मोडीसाठी जरी आले तरी त्यांना परत देण्यासाठी देखील व्यापाऱ्यांकडे रक्कम नसल्याचे नसल्याने किरण खोंडे यांनी सांगितले.
दर आणखी वाढण्याची शक्यता
अमेरिका-चीन व्यापार युद्ध सुरूच राहिल्यास सोन्याचे भाव आणखी वाढू शकतात. येत्या काळात सोनं 1 लाख 30 हजारापर्यंत देखील जाऊ शकतं, असाही अंदाज खोंडे यांनी व्यक्त केला आहे.