तुम्हाला केवायसी चा अर्थ नक्कीच माहीत असेल. केवायसी म्हणजे आपल्या ग्राहकाला ओळखा, ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे बँक किंवा कोणतीही आर्थिक संस्था आपल्या खातेधारकाच्या ओळख आणि पत्त्याची खात्री करते. मात्र, आता याच केवायसी प्रक्रियेचा गैरफायदा घेऊन सायबर गुन्हेगार लोकांची बँक अकाउंट रिकामं करत आहेत. KYC अपडेट केलं नाही तर तुमचं अकाउंट बंद होईल अशी धमकी देत आहेत.
advertisement
केवायसी फ्रॉड कसा होतो?
या फ्रॉडमध्ये सायबर भामटे स्वतःला बँकेचे अधिकारी असल्याचे भासवतात आणि ईमेल, एसएमएस किंवा फोन कॉलद्वारे तुमच्याशी संपर्क साधतात. अकाउंट अपडेटचे आमिष दाखवलं जातं. हे भामटे तुमचे अकाउंट डिटेल्स अपडेट करण्याच्या नावाखाली तुमच्याकडून बँक खात्याचे तपशील मागतात. यामध्ये अकाउंट लॉगिन डिटेल्स, डेबिट कार्ड नंबर, डेबिट कार्ड पिन अशा गोपनीय माहिती विचारतात किंवा कन्फर्म करुन घ्या असं म्हणतात.
खाते बंद करण्याची धमकी
जर तुम्ही ही माहिती देण्यास नकार दिला, तर ते तुमचे बँक खाते बंद करण्याची धमकी देतात. यामुळे लोक घाबरतात आणि घाईगडबडीत आपले डिटेल्स शेअर करतात. एकदा का तुम्ही माहिती दिली की, ते लगेच तुमच्या खात्यात प्रवेश मिळवतात आणि तुमचे अकाउंट रिकामे करतात.
लिंकवर क्लिक करणे धोक्याचे!
अनेकदा हे सायबर भामटे तुम्हाला एखादी फसवणूक करणारी लिंक (Link) पाठवून ती डाउनलोड करण्यासाठी किंवा त्यावर क्लिक करण्यासाठी आग्रह करतात. खबरदार! अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करताच तुमचे अकाउंट हॅक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा जाळ्यात अडकू नका. केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली जर तुम्हाला कोणी फोन किंवा मेसेज करत असेल, तर त्वरित अलर्ट व्हा, कारण ही धोक्याची घंटा आहे.
या तीन गोष्टी लक्षात ठेवा आणि सतर्क राहा!
1. बँक अधिकारी बनून आलेल्या कॉलकडे दुर्लक्ष करा: कोणत्याही व्यक्तीने बँक एक्झिक्युटिव्ह बनून फोन किंवा मेसेज केल्यास त्याला दुर्लक्ष करून तो नंबर त्वरित ब्लॉक करा.
2. अनोळखी लिंकवर क्लिक करू नका: अनोळखी नंबर किंवा स्रोताकडून आलेल्या कोणत्याही लिंकवर हरगिज क्लिक करू नका किंवा ती डाउनलोड करू नका.
3. फसव्या वेबसाइटपासून सावध रहा: बँकेच्या वेबसाइटशी मिळत्याजुळत्या फसव्या वेबसाइटची लिंक कोणी पाठवल्यास त्या लिंकवर क्लिक करू नका.
फसवणूक झाल्यास काय कराल?
जर तुमच्या परिसरात कोणी या फ्रॉडचा शिकार झाले असेल, तर त्यांना त्वरित खालील उपाययोजना करण्यास सांगा. १९३० या राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर त्वरित फोन करून घटनेची नोंद करा. किंवा भारत सरकारची वेबसाइट www.cybercrime.gov.in वर लॉग इन करून आपली तक्रार त्वरित दाखल करा. सायबर भामटे केवायसी फ्रॉडसाठी अनेक नवीन पद्धती वापरत आहेत. सुरक्षित राहण्यासाठी नेहमी सतर्क राहणे आवश्यक आहे.
