लोकलमध्ये वाढणाऱ्या गर्दीमुळे रेल्वेने काही विशेष उपाययोजना आखल्या आहेत. कारण, मध्य रेल्वे आता लवकरच 15 डब्यांच्या लोकल ट्रेनची संख्या वाढवणार आहे. यासाठी, मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील 34 रेल्वे स्थानकांपैकी 27 स्थानकांच्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. हे काम पूर्ण होताच 15 डब्यांच्या लोकल प्रवाश्यांच्या सेवेत दाखल होतील आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि आरामदायी होईल. प्रवाशांचा प्रवास अधिकच सोयीस्कर आणि व्यवस्थित व्हावा, यासाठी रेल्वेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला.
advertisement
मुंबई लोकलच्या गर्दीमुळे प्रवाशांची नेहमीच मागणी होती की, 12 डब्यांच्या लोकल ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवली जावी. आता अखेर लाखो प्रवाशांची मागणी रेल्वे पूर्ण करणार आहे. रेल्वे प्रशासनाने अखेर या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. 15 डब्यांची लोकल धावल्यास, एका फेरीत अधिक प्रवासी प्रवास करू शकतील आणि गर्दीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्याचे प्रमाण अधिक आहे. 15 डब्यांच्या लोकल फास्ट (Fast) आणि स्लो (Slow) अशा दोन्ही मार्गिकांवर धावणार आहेत. सुरुवातीला, सध्या कार्यरत असलेल्या 12 डब्यांच्या काही लोकलचे रूपांतर 15 डब्यांमध्ये केले जाणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढवण्यात येईल.
सर्वाधिक स्थानके कल्याण- कर्जत- खोपोली आणि कल्याण- कसारा या मार्गावर आहेत. यामुळे या पट्ट्यातील लांब पल्ल्याच्या प्रवाशांना विशेष फायदा होणार आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील एकूण 34 रेल्वे स्थानकांवर फलाट विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. "मुंबई मंडळातील 27 रेल्वे स्थानकांचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच 15 डब्यांच्या लोकलची संख्या वाढवता येईल.", अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले. फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये, वेळापत्रकामध्ये काही प्रमाणात बदल केला जातो, या वर्षी तो सुद्धा करण्यात आलेला नाही. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतरच नव्या वर्षात लोकलचे वेळापत्रक अपडेट केले जाईल.
कोणत्या स्टेशनचा होणार विस्तार?
- डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणारी स्थानके- विठ्ठलवाडी, उल्हासनगर, कर्जत, खोपोली, अंबरनाथ, आंबिवली, वाशिंद, आसनगाव, आटगाव, शैलू, बदलापूर, भिवपुरी, पळसधरी, मुंब्रा, कळवा, कोपर, ठाकुर्ली, टिटवाळा, कसारा.
- विस्तारीकरणाचे काम सुरू असलेली इतर स्थानके- मुंबई सीएसएमटी (Mumbai CSMT), ठाणे, कल्याण, डोंबिवली, वांगणी आणि खडावली.
