नवी मुंबई : कोकण रेल्वे कायमच प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन उपक्रम राबवत असते. सध्यात त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वेने आता प्रवाशांसाठी अत्याधुनिक डीजी लॉकर ही नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा नेमका प्रवाशांना कशा प्रकारे फायदा घेता येणार आहे आणि कोणत्या स्थानकावर ही सुविधा मिळणार या संबंधित सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
advertisement
प्रवासात बिनधास्त व्हा! कोकण रेल्वेने सुरू केली स्मार्ट डिजिटल लॉकर सुविधा
या उपक्रमामुळे प्रवाशांना त्यांच्या सामानाच्या सुरक्षिततेची चिंता पूर्णपणे सोडून देता येणार आहे. प्रवाशांना आता प्रवासादरम्यान त्यांच्या बॅग्स, मौल्यवान वस्तू किंवा जड सामान सुरक्षित ठेवण्यासाठी आता ही डिजिटल लॉकर सुविधा उपयोगी ठरणार आहे. कोकण रेल्वेने ही व्यवस्था पूर्णपणे स्वयंचलित, आधुनिक आणि महत्त्वाचे म्हणजे 24 तास सुरु ठेवली असून, प्रवाशांना कोणत्याही वेळी याचा लाभ घेता येईल. ही नवीन सेवा रत्नागिरी, थिवीम आणि उडुपी या प्रमुख स्थानकांवर 16 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहे.
अशा प्रकारे करता येणार 'डीजी लॉकर'चा वापर
या ‘डीजी लॉकर’चा वापर करण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल पेमेंट करता येते. यासाठी यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इतर डिजिटल माध्यमांचाही वापर प्रवाशांना करता येणार आहे. फक्त मोबाईलद्वारे काही सेकंदांत पेमेंट करून लॉकर वापरता येतो.
कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या सुविधेमुळे प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर आणि तंत्रज्ञानाधारित अनुभव मिळणार आहे. विशेषतहा सुट्टयांच्या दिवसात किंवा लांब प्रवासादरम्यान या सेवेमुळे प्रवाशांचा मोठा फायदा होईल. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अशा आधुनिक सुविधा आणणे हे कोकण रेल्वेच्या डिजिटल इंडिया संकल्पनेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी, थिवीम आणि उडुपी येथे या सुविधा सुरु केल्यानंतर पुढील दिवसांत इतर प्रमुख स्थानकांवरही ही सेवा सुरू करण्याचा विचार कोकण रेल्वेकडून सुरू आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण कोकण रेल्वे मार्गावर स्मार्ट लॉकर नेटवर्क उभे राहणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
