परिवहन विभागाकडे आतापर्यंत 86 लाख 3 हजार वाहनधारकांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी 68 लाख 24 हजार वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे. मात्र अजूनही सुमारे एक कोटी 13 लाख वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आरटीओ कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
2019 पूर्वीच्या वाहनांसाठी अनिवार्य अंमलबजावणी
2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर एचएसआरपी बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्लेट्समुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित होते आणि चोरी किंवा नंबर बदलण्यासारख्या प्रकारांवर आळा बसतो. या कामासाठी परिवहन विभागानं राज्यातील आरटीओ कार्यालयांना तीन झोनमध्ये विभागून तीन वेगवेगळ्या कंपन्यांची नेमणूक केली आहे.
advertisement
झोननुसार विभागणी
झोन 1 : बोरिवली, ठाणे, पनवेल, पुणे, कोल्हापूरसह 12 आरटीओ
झोन 2 : मुंबई सेंट्रल, कल्याण, पेण, रत्नागिरी, सातारा आदी 16 आरटीओ
झोन 3 : वडाळा, वाशी, सिंधुदुर्ग, नाशिक, सांगली, कऱ्हाडासह 27 आरटीओ
परिवहन विभागानं वाहनधारकांना 30 नोव्हेंबर 2025 ही अंतिम मुदत दिली आहे. या तारखेनंतर ज्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नसेल, किंवा उशिरा ऑर्डर केली असेल, अशा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यामुळे उशिर टाळण्यासाठी नागरिकांना लवकरात लवकर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
शुल्क आणि अर्ज प्रक्रिया
एचएसआरपीची किंमत वाहनाच्या प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार बदलते. चारचाकी, दुचाकी आणि मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले आहेत. ही नंबरप्लेट बसवण्यासाठी नागरिकांनी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्यानंतर ऑनलाइन शुल्क (जीएसटीसह) भरून ठरवलेल्या दिवशी आरटीओ केंद्रावर जाऊन प्लेट बसवली जाते.
