दादरच्या चैत्यभुमीवर बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी राज्यासह देशभरातून येत असतात. बाबासाहेबांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागामार्फत महापरिनिर्वाण दिनानिमित्त तीन दिवसीय ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट’चे आयोजन करण्यात आले आहे. या टूर सर्किटचे नियोजन 3 डिसेंबर, 4 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असे तीन दिवस करण्यात येणार आहे. या टूर सर्किटच्या माध्यमातून मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले असून बाबासाहेबांनिगडित महत्त्वाच्या स्थळांना भेटी देऊन पर्यटकांना त्याचे दर्शन घडवले जाणार आहे.
advertisement
मोफत आयोजित केलेल्या ह्या टूर सर्किटमध्ये चैत्यभूमी, राजगृह, वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स व कॉमर्स महाविद्यालय, डॉ. आंबेडकर भवन, परळमधील बीआयटी चाळ, फोर्ट येथील सिद्धार्थ महाविद्यालय अशा महत्त्वपूर्ण स्थळांचं पर्यटकांना दर्शन घडवलं जाणार आहे. या टूर सर्किटची सुरुवात 3 डिसेंबरला सकाळी 9.30 वाजता शिवाजी पार्क परिसरातील वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाजवळून केली जाणार आहे. सहलीची सुरुवात आणि समारोप चैत्यभूमी दादर येथेच होणार आहे. या माध्यमातून नागरिकांना अधिक जवळून बाबासाहेबांचे विचार आत्मसात करायला मिळणार आहेत.
