प्रभादेवी पुलाचा सुमारे 32 मीटर भाग मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून जातो. दोन्ही विभागात रात्री स्वतंत्रपणे पाडकाम करण्याचे नियोजन आहे. सुरुवातीची कामे मध्य रेल्वेच्या मर्यादेत होतील. पुलाच्या गर्डर आणि ओव्हरहेड वायर यांच्यातील अंतर अत्यंत कमी असल्याने कामादरम्यान त्या विभागाची वीज पूर्णपणे खंडित करावी लागणार आहे, ज्यामुळे ब्लॉक कालावधी आणखी वाढणार आहे.
advertisement
40 एक्स्प्रेस, 1250 लोकलला फटका
या ब्लॉकचा थेट परिणाम रेल्वे वेळापत्रकावर होणार आहे. चारही मार्ग बंद केल्यास तब्बल 40 एक्सप्रेस/मेल गाड्या आणि सुमारे 1250 लोकल सेवा प्रभावित होतील. बाहेरगावाहून येणाऱ्या तीन गाड्यांचे दादर किंवा एलटीटी येथे वळवणेही कठीण आहे, कारण स्थानकांवरील क्षमता मर्यादित आहे.
पूर्वी कर्नाक बंदर पुलाच्या पाडकामावेळी सीएसएमटी–मस्जिद दरम्यान संपूर्ण वाहतूक रोखण्यात आली होती; परंतु त्या वेळी एक्सप्रेस गाड्यांना वाडीबंदर यार्ड किंवा दादर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्याची सुविधा उपलब्ध होती. प्रभादेवी प्रकरणात हे शक्य नसल्याने मोठ्या प्रमाणावर रद्दीकरण टाळणे अवघड ठरत आहे.
असा एक पर्याय
या सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर आता एक पर्याय पुढे आला आहे. चारही मार्गिका एकाच वेळी बंद न करता एक-एक मार्गिका टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा विचार सुरू आहे. अशा पद्धतीने काही सेवांना वळसा किंवा सीमित स्वरूपात चालू ठेवता येऊ शकते. मात्र या पर्यायामुळे कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रभादेवी पुलासाठी आवश्यक असलेल्या 15 तासांच्या ब्लॉकचे वैज्ञानिक नियोजन कसे करायचे, प्रवाशांवर परिणाम कसा कमी करायचा आणि काम विलंबित न होता ते कसे पार पाडायचे, ही तीनही आव्हाने आता मध्य रेल्वेसमोर उभी आहेत.






